आचारसंहितेचा भंग केल्यास कडक कारवाई
By admin | Published: August 3, 2015 04:23 AM2015-08-03T04:23:57+5:302015-08-03T04:23:57+5:30
पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका होत आहेत, अशा गावांसह प्रामुख्याने नीरा
नीरा : पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका होत आहेत, अशा गावांसह प्रामुख्याने नीरा शहरातील निवडणूकीतील उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्यास तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार
आहे, असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी बोलताना दिला.
पुरंदर तालुक्यातील नीरा ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या प्रचाराची सांगता रविवारी संध्याकाळी झाली. निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. जय जाधव यांनी पुणे जिल्ह्यात अधिक प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. नीरा शहरात देखील निवडणूकीच्या पाश्वर्भूमीवर बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा दाखल झाला आहे. जेजुरीचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाच्या आणि होमगार्डच्या तुकड्यांनी नीरा शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन केले.
नीरा शहरातील प्रमुख मार्गावरून करण्यात आलेल्या संचलनामध्ये पोलीस निरीक्षक रामदास शेळके, नीरा दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव, पोलीस उपनिरीक्षक रमेश वायकर, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल भालेराव यांच्यासह ३५ पोलीस कमर्चारी, ५ महिला पोलीस कमर्चारी, २० होमगार्ड, ९ महिला होमगार्ड सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास तसेच मतदान केंद्राच्या १०० मीटर
अंतराच्या आत उमेदवार अगर त्यांचे प्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी मतदारांना प्रलोभन देणे , दहशत निर्माण करणे किंवा संशयास्पद हालचाली केल्यास संबंधितांवर पोलीस कडक कारवाई करणार
आहे, असा इशारा देत उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी आचार संहितेचे
काटेकोर पालन करून निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी केले आहे.
दरम्यान, नीरेतील सत्ताधारी विकास आघाडी आणि विरोधी चव्हाण गट या दोन्ही गटांच्या प्रचाराची सांगता सभा रविवारी संध्याकाळी झाली.