अनिल भोसलेंच्या मालमत्तेवर टाच आणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 02:22 PM2019-12-14T14:22:46+5:302019-12-14T14:26:39+5:30

राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल होण्यास होतेय टाळाटाळ

strict action will taken about property of Anil Bhosale | अनिल भोसलेंच्या मालमत्तेवर टाच आणा

अनिल भोसलेंच्या मालमत्तेवर टाच आणा

Next
ठळक मुद्देकृती समितीची मागणी आर्थिक गैरव्यवहारामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घातले भोसले सहकारी बँकेवर निर्बंध भोसले यांनी वेळोवेळी पैसे भरण्याचे दिले आश्वासन

पुणे : श्री शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील गैरव्यवहाराला जबाबदार असणाऱ्या आमदार अनिल भोसले यांच्या मालमत्तेवर टाच आणावी, त्यांच्यासह दोषी संचालक व अधिकाऱ्यांना अटक करावी, अशी मागणी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या खातेदार-ठेवीदार कृती समितीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. बँकेचे लेखापरीक्षण करणाऱ्या संस्थेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. राजकीय वरदहस्तामुळे भोसले यांना अभय दिले जात असल्याचा आरोपही कृती समितीने केला. 
समितीचे सुधीर आल्हाट, नगरसेवक दत्ता बहिरट, प्रवीण वाळवेकर व खातेदार उपस्थित होते. आर्थिक गैरव्यवहारामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) भोसले सहकारी बँकेवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे बँकेतील ७५ हजार ठेवीदार व १ लाख खातेदारांचे कोट्यवधी रुपये बँक खात्यात अडकले आहेत. आरबीआयने केवळ १ हजार रुपये काढण्यास मुभा दिली आहे. तसेच, आरबीआयने बँकेच्या प्रशासकांना तुमच्यावर दिवाळखोरीची कारवाई का करू नये? अशी कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. 
आल्हाट म्हणाले, की कृती समितीसमवेत झालेल्या चर्चेत भोसले यांनी वेळोवेळी पैसे भरण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, त्यांनी एकही पैसा भरलेला नाही. बँकेचे लेखापरीक्षण केलेल्या संस्थेने डेक्कन पोलीस ठाण्यामधे तक्रार दिली आहे. मात्र, राजकीय वरदहस्त असल्याने भोसले यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही. तत्कालीन सहकार आयुक्त विजय झाडे यांनी बँकेच्या संचालक मंडळावर फौजदारी कारवाईचा आदेश दिला होता. मात्र, नातेवाईक असलेल्या तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी त्यास स्थगिती दिली. आगामी अधिवशेनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची समितीचे सदस्य भेट घेतील. त्यांना दोषींवर कारवाईची विनंती केली जाईल. 
.......
७३ कोटींचे काय झाले...
गेल्या दहा वर्षांपासून बँकेतील गैरव्यवहार झाकले जात आहेत. बँकेकडे ४४० कोटी रुपयांच्या ठेवी असून, ३१० कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. 
संचित तोटा ५० कोटी रुपये आहे. त्यामुळे ३१ मार्च २०१९ नुसार ७३ कोटी रुपये बँकेत शिल्लक हवे होते. त्याचा हिशेब लागत नसल्याचा आरोप कृती समितीने केला. 
....
माझ्या पतीचे निधन झाले आहे. माझी २१ लाखांची बचत बँकेच्या औंध शाखेत ठेवली आहे. मुलाच्या शिक्षणासाठी हे पैसे ठेवलेले. आता माझी अडचण झाली आहे. सरकार चोरांना संरक्षण देते, खातेदारांचे पैसे लवकरात लवकर मिळतील, याची दक्षता घ्यावी.- राजमती बिरजे, खातेदार
.....
नोव्हेंबर महिन्यात माझी एक शस्त्रक्रिया झाली. त्यासाठी बँकेकडे अर्ज करूनही पैसे मिळाले नाहीत. कोथरूड शाखेत माझे साडेतेरा लाख रुपये आहेत. पैसे असूनही मित्रांकडून उसने घेऊन उपचाराचा खर्च भागवावा लागला. - अरुण देसाई, ज्येष्ठ नागरिक

Web Title: strict action will taken about property of Anil Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.