पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये कडकडीत बंद; शहरातील दुकानांचाही बंदला प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 10:27 AM2022-12-13T10:27:07+5:302022-12-13T10:27:33+5:30
पुणे बंद मध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत बंद ठेवून पाठिंबा देण्याचा निर्णय व्यापारी महासंघाकडून घेण्यात आला आहे
पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध म्हणून आज पुणे बंद पाळण्यात येत आहे. बंदबरोबरच आता मूक मोर्चाचेही आयोजन केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या राजकीय पक्षांबरोबरच संभाजी ब्रिगेड व अन्य अनेक सामाजिक, स्वयंसेवी संस्था, संघटना, व्यापारी महासंघ, गणेशोत्सव मंडळे, यांनी पुणे बंदला पाठिंबा जाहीर दिला आहे. पुण्यातील मार्केटयार्ड या परिसरात शुशुकाट दिसून आला आहे. तर शहरातील दुकानांनीसुद्धा बंदला पाठिंबा दिल्याचे चित्र दिसून येत आहे.
संभाजी बिग्रेड,काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना,आर.पी.आए.ई .सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यानी पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्या कार्यालयात भेट घेतली होती. व छत्रपती शिवाजी महाराजांचा वेळोवेळी अवमान केल्याच्या निषेधार्थ पुणे बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या सभेमध्ये त्यांच्या आवाहनावर चर्चा करण्यात आली. पुणे बंद मध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत बंद ठेवून पाठिंबा देण्याचा निर्णय व्यापारी महासंघाकडून घेण्यात आला आहे. तसेच मार्केटयार्ड मधील विक्रेत्यांनी बंदला पाठिंबा देण्याचे ठरवले होते. त्यानुसार आज सकाळपासूनच मार्केटयार्डमध्ये शुकशुकाट असल्याचे दिसून आले आहे.
मोर्चामध्ये लहानग्यांचा सहभाग
पुणे बंदमध्ये मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी साडेनऊ वाजता या मोर्चाला सुरुवात झाली आहे. अलका चित्रपटगृह चौक, लक्ष्मी रस्ता, बेलगाव चौक मार्गे लाल महालाजवळ जाहीर सभेने मूक मोर्चाची सांगता होणार आहे. महिलांबरोबरच लहान मुलेही या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातील संस्कृतीच्या वारसा जपणाऱ्या वेशभूषा या लंग्यानी प्रदान केल्या आहेत.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
पुणे बंदमध्ये काही तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ नये. यासाठी शहराच्या प्रमुख रत्स्यांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.