स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरात कडक पोलीस बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:14 AM2021-08-15T04:14:13+5:302021-08-15T04:14:13+5:30
पुणे : स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. ...
पुणे : स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. तसेच शहरातील सर्व पोलीस ठाण्यांसह शहर गुन्हे अन्वेषण विभाग, विशेष शाखा, वाहतूक नियंत्रण विभागाबरोबरच राज्य राखीव पोलीस दलाची पथके तैनात करण्यात आली आहेत.
कौन्सिल हॉलच्या प्रांगणात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ध्वजवंदनाचा शहरातील मुख्य शासकीय कार्यक्रम होईल. पोलीस मुख्यालयातही विशेष संचलन होणार आहे. त्याचबरोबर निरनिराळ्या संस्था, संघटनांतर्फेही ध्वजवंदनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर काही दहशतवादी संघटना घातपात घडवण्याची शक्यता गेल्या आठवड्यात गुप्तचर विभागाने सूचित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर, प्रामुख्याने महानगरांमध्ये खबरदारी घेण्याच्या सूचना गृहमंत्रालयाने दिल्या आहेत. त्यामुळे शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जातीय, धार्मिकदृष्ट्या संवेदनशील ठिकाणी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला वाहन तपासणी व लॉजेस तपासणीही करण्यात आली.
गेल्या दोन दिवसांत शहर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून शहरातील सर्व हॉटेल, लॉजेसची तपासणी केली. तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगाराची तपासणी केली.