डिंभे येथूनच कडक बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:14 AM2021-08-24T04:14:45+5:302021-08-24T04:14:45+5:30
डिंभे: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील श्रावणयात्रा बंद ठेवण्यात आली असून, आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात ...
डिंभे: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील श्रावणयात्रा बंद ठेवण्यात आली असून, आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात पर्यटनासही बंदी करण्यात आली आहे. यामुळे तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने भीमाशंकरकडे कोणीही जाऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने डिंभे येथूनच कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. पर्यटनासही या भागात बंदी असल्याने डिंभे धरण, आहुपे, कोंढवळ व भीमाशंकरकडे जाणाऱ्या वाहनांची डिंभे येथेच कडक तपासणी करण्यात येत होती.
श्रावण महिन्यात दर वर्षी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मोठी यात्रा भरते. महाराष्ट्र राज्यासह परराज्यातील लाखो भाविक श्रावणातील येणाऱ्या सोमवारी भीमाशंकर येथे दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. संपूर्ण श्रावणात या ठिकाणी मोठी गर्दी असते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या भागात जाण्यास बंदी आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ३०(२,३,व४) अन्वये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून श्री क्षेत्र भीमाशंकर यात्रा बंद ठेवण्यात आली आहे. यात्रा बंद असल्याने भाविकांनी या भागात येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच संचारबंदी असल्याने पर्यटकांनाही या भागात फिरण्यास मज्जाव आहे. यामुळे डिंभे धरण, आहुपे, कोंढवळ या भागातही पर्यटनास बंदी आहे.
तिसऱ्या श्रावणी सोमवारमुळे येथे दर वर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतील, यामुळे प्रशासनाकडून भीमाशंकर येथे येण्यास बंदी घातली आहे. या आदेशाने कडेकोट पालन करण्यासाठी घोडेगाव खेड पोलीस स्टेशनकडून अनेक ठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. आंबेगाव तालुक्यातून भीमाशंकरकडे जाण्यासाठी डिंभे हे प्रवेशद्वार असल्याने येथपासूनच बंदोबस्तास सुरुवात झाली होती. डिंभे वाय पॉर्इंट, तळेघर, पालखेवाडी, भीमाशंकर एसटी स्टँड व महाद्वारपर्यंत पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा भीमाशंकर श्रावण यात्रा बंद आसल्याने आदेशाचे पालन करण्यासाठी डिंभे येथूनच पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.