Kasba By Elelction: पोटनिवडणुकीच्या निकालामुळे कसबा मतदार संघात कडक बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 07:54 PM2023-03-01T19:54:28+5:302023-03-01T20:43:56+5:30
निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यास पोलिसांची मनाई
पुणे: कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल गुरूवारी जाहीर होणार असून संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून कोरेगाव पार्क भागातील अन्न धान्य महामंडळाचे गोदाम तसेच शहरातील मध्यभागात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यास पोलिसांनी मनाई केली आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर संभाव्य अनुचित घटना आणि कार्यकर्त्यांमधील वाद टाळण्यासाठी पोलिसांकडून मतमोजणी होणार्या कोरेगाव पार्क येथील शासकीय अन्न धान्य महामंडळाचे गोदाम तसेच मध्य भागातील कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ, रविवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, घोरपडे पेठ, लोहियाननगर, कासेवाडी भागात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बुधवारी (१ मार्च) पोलीस आयुक्तालायात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला. संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. विशेष शाखा तसेच गुन्हे शाखेतील पोलिसांची पथके मध्यभागात गुरुवारी गस्त घालणार आहेत.
समाजमाध्यमावर पोलिसांचे लक्ष
समाजमाध्यमात आक्षेपार्ह मजकुरावर पोलिसांची नजर राहणार आहे. सायबर गुन्हे शाखेचे पथक समाजमाध्यमातील संदेशांवर लक्ष ठेवणार आहे. गैरप्रकार तसेच आक्षेपार्ह संदेश प्रसारित केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. निकालानंतर शहरात काही पडसाद उमटल्यास संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांची नजर राहणार आहे. निकालापूर्वी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना त्वरीत पोहोचता यावे तसेच कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्राच्या परिसरात पाेलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.