आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 01:00 AM2018-08-09T01:00:20+5:302018-08-09T01:00:37+5:30
सकल मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन पुकारले असल्याने शहर पोलीस दलाने कडक बंदोबस्त आयोजित केला
पुणे : सकल मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन पुकारले असल्याने शहर पोलीस दलाने कडक बंदोबस्त आयोजित केला असून वरिष्ठ अधिकारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, शीघ्र कृती दल, होमगार्डसह संपूर्ण शहरात ६ हजार पोलीस रस्त्यावर असतील़ महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांबरोबर सुसंवाद ठेवावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनातर्फे सर्व प्रांत व तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे कोणीही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता ठिय्या आंदोलन करण्यात येईल़ या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे़ या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे़ तसेच कोथरूड, जंगली महाराज रस्ता या ठिकाणाहून दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे़ तसेच, शहराच्या वेगवेगळ्या भागांतून रॅली काढून कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जमणार आहेत़ त्यासाठी पोलीस ठाण्याच्या पातळीवर स्वतंत्र बंदोबस्त असेल. विशेष शाखेचा साध्या गणवेशातील बंदोबस्त असेल़ त्यात २ सहायक पोलीस आयुक्त, ४ पोलीस निरीक्षक आणि १२५ कर्मचारी असतील़ नियंत्रण कक्ष तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी यांना राखीव ठेवण्यात आले आहेत़ शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात १०० कर्मचारी राखीव ठेवण्यात येणार आहेत़ अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी त्यांचा स्ट्रायकिंग फोर्स तयार केला आहे.
सकल मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे. त्याचप्रमाणे बुधवारी मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांबरोबर बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली आहे. तसेच, तालुका स्तरावर व ग्रामीण भागातही आंदोलन शांततेच्या मार्गाने व्हावे, यासाठी प्रांत व तहसीलदारांना बैठका घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सांगितले.
हॉटेल, आठवडेबाजार बंद करण्याचेही आदेश काढण्यात आले आहेत, असे नमूद करून देशमुख म्हणाले, ‘‘उर्से टोलनाका येथे रास्ता रोको व लोणवळ्यात रेलरोको करणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. त्यावर आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
>आंदोलन समन्वयकांचे शांततेचे आवाहन
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी पोलिसांचा सातत्याने संपर्क असून बंद आंदोलन शांततेत व्हावे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नये़ नागरिकांनी उद्याच्या बंदमध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे़ सकल मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन पुकारले आहे़ तसेच, शहरात बंदचे आवाहन करण्यात आले आहे़
>प्रवाशांची गर्दी, परिस्थिती पाहून एसटी गाड्या सोडण्याबाबत विचार
प्रवाशांची गर्दी, आंदोलनाची परिस्थिती आणि पोलिस संरक्षण या गोष्टींचा विचार करून काही गाड्या सोडण्याबाबत उद्या निर्णय घेण्यात येईल, असे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले. बंदच्या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसेच एसटी बसचे नुकसान होऊन नये याकरिता एसटी महामंडळाच्या वतीने सावधानता बाळगण्यात आली आहे. याअंतर्गत पुणे विभागातील एसटी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आंदोलनाच्या कालावधीत प्रवाशांच्या गर्दीचा अंदाज घेऊन तसेच परिस्थिती आणि पोलीस संरक्षणाचा विचार करून काही बस सोडण्याबाबत उद्या आगार स्तरावर निर्णय घेण्यात येईल, असे एसटी प्रशासनाने सांगितले. काही दिवसांपूर्वी मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आलेल्या आंदोलनाला चाकण येथे हिंसक वळण लागले होते. त्यात एसटीच्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे तब्बल तीन दिवस पुणे-नाशिक मार्गावरील एसटी सेवा बंद ठेवावी लागली होती. एसटी गाड्यांचे पुन्हा नुकसान होऊ नये तसेच प्रवाशांची सुरक्षितता याचा विचार करून उद्या एसटी सेवा बंद करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
<हे बसमार्ग राहणार बंद
पुणे-सातारा रस्त्याने नसरापूर, कोंढणपूर, शिवापूरकडे जाणारे बसमार्ग कात्रजपर्यंतच ठेवण्यात येणार आहे. बोपदेव घाट मार्गे जाणाऱ्या बस येवलेवाडीपर्यंत, हडपसर-सासवड रस्त्याने संचलनात असणारे बसमार्ग फुरसुंगीपर्यंत ठेवण्यात येणार आहेत. पुणे-सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी आगारापर्यंत आणि पुणे-नगर रस्त्यावरील सर्व बसमार्ग वाघोलीपर्यंत सुरू राहणार आहेत. तर, हडपसर-वाघोली मार्ग, आळंदी रस्ता (आळंदी ते वाघोली मार्गे मरकळ), निगडी ते चाकण हे बसमार्ग बंद ठेवण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले असून, सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक नियंत्रण कक्ष २४ तास सुरू राहणार आहेत. पुणे शहर व शहरहद्दीबाहेरील संचालित बसमार्ग पुढीलप्रमाणे : यात पुणे-नाशिक रस्त्यावरील संचालित सर्व बसमार्ग बंद ठेवण्यात येणार आहेत. पुणे-मुंबई रस्त्याने निगडीच्या पुढे देहुगाव, वडगाव, कामशेत व किवळेकडे जाणारे बसमार्ग बंद असणार आहेत. पौड रस्त्यावरील बसमार्ग केवळ चांदणी चौकापर्यंत सुरू राहणार आहेत. तर, वडगाव धायरीच्या पुढील सर्व बसमार्ग वडगाव धायरीपर्यंतच सुरू राहणार आहेत. मांडवी-बहुली रस्त्यावरील बसमार्ग वारजे माळवाडीपर्यंत सुरू राहणार आहे.
>शाळा-महाविद्यालये बंद
स्थानिक परिस्थिती गृहीत धरून मुख्याध्यापकांना शाळेला वार्षिक ३ दिवस स्थानिक सुटी देण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवावीत. त्या दिवसाच्या तासिका इतर दिवशी घ्याव्यात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील शाळांबाबत आयुक्त व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांनी शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकाºयांच्या मदतीने शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश काढावेत. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवांनी व अभिमत विद्यापीठांच्या कुलसचिवांनी आपल्या स्तरावर महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. विद्यापीठ शैक्षणिक विभाग व प्रशासकीय विभागही पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच गुरुवारी (दि. ९) नियोजित करण्यात आलेल्या विद्यापीठातील सर्व सभा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असे परिपत्रक प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी काढले आहे.
>काही पेट्रोलपंपही
राहणार बंद
आॅल इडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनने पेट्रोलपंप बंद ठेवण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. सर्वसामान्य नागरिकांचे कोणत्याही परिस्थितीत हाल होऊ नयेत यासाठी गुरुवारी पेट्रोलपंप सुरू राहणार आहेत. मात्र, काही पेट्रोलपंप चालकांनी स्वत:हून बंदमध्ये सहभागी होऊन पंप बंद ठेवणार असल्याचे घोषित केले आहे.
>सराफा दुकाने बंद
बंदच्या पार्श्वभूमीवर सराफा व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवण्याचे जाहीर केले नसले, तरी गुरुवारची परिस्थिती पाहून दुकाने बंद किंवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. सराफ असोसिएशनकडून व्यावसायिकांना कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत.
>कडक बंदोबस्त
४ अतिरिक्त पोलीस आयुक्त, १० पोलीस उपायुक्त, १५ सहायक पोलीस आयुक्त, १०० पोलीस निरीक्षक, २०० सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, ६ हजार कर्मचारी यांचा बंदोबस्त असेल. त्यांच्याशिवाय एक राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, ४ स्ट्रायकिंग फोर्स, राखीव, शीघ्र कृती दलाच्या २ तुकड्या, दंगलविरोधी वज्र, वरुण या वाहनांचा बंदोबस्त असेल़