गतवर्षी लॉकडाऊनमधील कडक निर्बंधामुळे अपघातांचे प्रमाण घटले;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:08 AM2021-06-29T04:08:34+5:302021-06-29T04:08:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या कडक संचारबंदीमुळे रस्त्यांवर वाहनांचे प्रमाण अत्यल्प होते. ...

Stricter restrictions in the lockdown last year reduced the number of accidents; | गतवर्षी लॉकडाऊनमधील कडक निर्बंधामुळे अपघातांचे प्रमाण घटले;

गतवर्षी लॉकडाऊनमधील कडक निर्बंधामुळे अपघातांचे प्रमाण घटले;

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या कडक संचारबंदीमुळे रस्त्यांवर वाहनांचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे २०२० मध्ये ४५५ अपघातांमध्ये २९७ जखमी आणि १४३ मृत्यू नोंदविले गेले. त्यातुलनेत यंदाच्या वर्षी लॉकडाऊनचे नियम काहीअंशी शिथिल झाल्याने रस्त्यांसह महामार्गावर देखील वाहनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे जानेवारी ते २८ मे २०२१ अखेरपर्यंतच्या पाच महिन्यात २०३ अपघाताची नोंद झाली आहे. त्यात ७८ जणांचे मृत्यू आणि १४६ व्यक्ती जखमी झाल्या आहेत.

काही बेशिस्त वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे पालन न करणे, विना हेल्मेट दुचाकी चालविणे, ट्रिपलसीट प्रवास करणे, अतिवेगाने वाहन चालविणे, सिग्नल तोडणे ही कारणे अनेकांच्या जीवावर बेतली आहेत. यातच महामार्गांवर ८० स्पीडपेक्षा जास्त वेगाने गाडी चालविणे, गाडीवरचा ताबा सुटणे आणि गाडीचे ब्रेक फेल होणे अशा कारणांमुळे अपघात घडण्याचे प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या लॉकडाऊन काळात कडक संचारबंदीमुळे अपघाताचे प्रमाण हे २०१८-२०१९ च्या तुलनेत घटलेले पाहायला मिळाले. मात्र यंदाच्या वर्षी लॉकडाऊन असले तरी अत्यावश्यक सेवांसह विविध क्षेत्र सुरू ठेवली आहेत. लोणीकाळभोर आणि लोणीकंद पोलीस स्टेशन शहराच्या हद्दीत आल्याने त्या भागातील मार्चनंतर महामार्गावर झालेल्या १५ ते १६ अपघातांची संख्या देखील समाविष्ट झाली आहे. त्यामुळे गेल्या पाच महिन्यात ७८ मृत्यूंची नोंद झाली आहे. अन्यथा ही संख्या ६० च्या आसपासची असती. तरीही नागरिकांचे प्रबोधन, वाहतुकीच्या नियमांची कडक अमंलबजावणी अन्यथा कारवाईचा बडगा यावर लक्ष्य केंद्रित करीत आहोत. मात्र मानवी चुका टाळल्या तर अपघात नक्कीच टाळता येतील असा सल्ला वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुले श्रीरामे यांनी दिला आहे.

----------------------------------------

कालावधी एकूण अपघात एकूण जखमी एकूण मृत्यू

2018 1049 657 220

2019 729 688 206

2020 455 297 143

1 जानेवारी ते 203 146 78

28 मे 2021 अखेर

-----------------------------------

२५ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचे अपघातांचे प्रमाण जास्त

वेगाने वाहन चालविणे, दारू पिऊन गाडी चालविणे अशा कारणांमुळे २५ ते ४५ वयोगटातील अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

------------------------------------

वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. दुचाकीस्वारांनी गाडी चालविताना हेल्मेट परिधान केले पाहिजे. गतवर्षी जे १४३ जणांचे मृत्यू झाले. त्यामध्ये ८० दुचाकीस्वारांचे मृत्यू झाले आहेत. त्यात ७२ लोकांनी हेल्मेट घातलेले नव्हते. हेल्मेट घातले तर अपघातात मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते. महामार्गावर गाडी चालविताना स्पीड नियंत्रणात ठेवावा. वाहतुकीच्या नियमांचे पालन केले तर अपघात टाळणे आपल्या हातात आहे. मृत्यूचा सापळा बनलेल्या अपघातांच्या ठिकाणांवर वाहतूक विभागाने विशेष लक्ष्य केंद्रित केले असून, त्या भागात दिशादर्शक फलक लावले आहेत. - राहुल श्रीरामे, उपायुक्त वाहतूक विभाग

-----------------------

काळ आला पण वेळ नाही

मी सायंकाळी पाचच्या सुमारास पुणे कात्रज हायवेमार्गे येत होतो. अचानक मागून एका कारची धडक बसली आणि मी बेशुद्ध झालो. लोकांनी लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. हाताला थोडी जखम झाली होती. मात्र पाठीला जोरदार हिसका बसला होता. माझे नशीब की फार काही झाले नाही. चूक माझी नसतानाही मला अपघाताला सामोरे जावे लागले. पण काळ आला असला तरी वेळ आली नाही म्हणून बचावलो.

- सूरज लांडगे, तरुण

--------------------

Web Title: Stricter restrictions in the lockdown last year reduced the number of accidents;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.