अल्कली अमाइन्सविरोधात कुरकुंभमध्ये कडकडीत बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 01:43 PM2019-08-17T13:43:48+5:302019-08-17T13:45:59+5:30
अल्कली कंपनीच्या निष्काळजीपणामुळे घडलेल्या या घटनेच्या विरोधात ग्रामस्थांनी आपला रोष व्यक्त केला.
कुरकुंभ : अल्कली अमाइन्स कंपनीला लागलेल्या आगीमुळे बुधवारी रात्री कुरकुंभ, पांढरेवाडी, मुकादमवाडी, झगडेवाडी परिसरातील ग्रामस्थांमध्ये अफवांचे पेव फुटल्याने गोंधळ निर्माण झाला होता. हजारो कुटुंबे भीतीने पलायन करू लागली होती. परिस्थिती निवळल्यानंतर ग्रामस्थ माघारी आले. मात्र, त्यामुळे प्रचंड गदारोळ व मानसिक ताणातून नागरिकांनी स्थलांतर केले होते. अल्कली कंपनीच्या निष्काळजीपणामुळे घडलेल्या या घटनेच्या विरोधात ग्रामस्थांनी आपला रोष व्यक्त करीत शुक्रवारी (दि. १६) निषेध करीत कडकडीत बंद पाळला.
अल्कली अमाइन्स या कंपनीत वापरले जाणारे विविध रसायन प्रक्रियेतून निघणारे घातक रसायन (डीमापा) स्टोरेज यार्डमध्ये ठेवले होते. सुमारे ३० टनापेक्षा जास्त साठा असलेल्या कंपनीचा परिसर कामगार विरहित असल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, अल्कली कंपनीत असलेला हायड्रोजनचा साठा पाहता भीतीच्या व अफवेच्या वातावरणाने तणाव निर्माण केला. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील अग्निशामक दल, पुणे, इंदापूर, बारामती, ऑनर कंपनी व इतर कंपनीतील दलाने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीचे स्वरूप मोठे असल्याने रात्री एकपर्यंत हे काम सुरू होते. रासायनिक द्रव्यांनी भरलेले ड्रम आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने आगीचे लोट उंच आकाशात पसरत होते.
दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी घटनास्थळी परिस्थितीवर नियंत्रणाचा प्रयत्न केला. मात्र, नियोजनाच्या अभावाने फक्त तटस्थ उभे राहण्यापलीकडे त्यांना काहीच करता आले नाही. दुसरीकडे हजारो ग्रामस्थ पलायन करीत असताना कुठल्याही शासकीय अधिकाºयाने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडलेला दिसून आला.
बुधवारी रात्री उशिरा आमदार राहुल कुल यांनीदेखील घटनेची तीव्रता लक्षात घेत भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या घटनेबाबत तत्काळ कारवाईची ग्रामस्थांची मागणी लक्षात घेता जिल्हाधिकारी आणि औद्योगिक वसाहतीचे पदाधिकारी आणि आणि अधिकाºयांची बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
परिस्थितीचे गांभीर्य पाहता जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे वासुदेव काळे आणि इतरांनी घटनास्थळी भेट दिली. या परिसरात काही काळ वातावरण तणावाचे निर्माण झाले होते. मात्र, नागरिकांना शांतात ठेवून प्रशासनाला पुढील कारवाई करू देण्याचे आवाहन कुल यांनी केले. अल्कली अमाइन्सचे अधिकारी राकेश गोयल, उदय घाग, राजेश कावले, राजीव खेर यांनी घटनेची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र, वारंवार लागणाºया आगीचे कारण त्यांना देता आले नाही. तसेच त्यांनी किती आर्थिक नुकसान झाले, याबाबतही बोलणे टाळले.
.......
*अल्कली अमाइन्स कंपनीतील आगीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन व पसरलेले भीतीचे वातावरण, याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या कुरकुंभ व पांढरेवाडी ग्रामपंचायत सदस्यांना व विविध वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना पोलिसांनी कंपनी व्यवस्थापनाशी बोलू न देता प्रवेशद्वारावरच अडवून धरले.
* कंपनीविरोधात बोलणाऱ्या नागरिकांना दम देत राखीव दलाच्या तुकडीला पाचारण करून पिटाळून लावले. बुधवारी रात्री एवढी मोठी घटना घडूनदेखील अल्कली कंपनीविरोधात काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. सर्वसामान्यांना मात्र बळाच्या जोरावर गप्प करण्याचे काम पोलीस प्रशासन करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
* अल्कली अमाइन्स कंपनीतील आगीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन व पसरलेले भीतीचे वातावरण, याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या कुरकुंभ व पांढरेवाडी ग्रामपंचायत सदस्यांना व विविध वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना पोलिसांनी कंपनी व्यवस्थापनाशी बोलू न देता प्रवेशद्वारावरच अडवून धरले.