आळंदीत करवसुलीसाठी धडक कारवाई; १४ मालमत्ता सील तर ४८ नळ कनेक्शन कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 18:52 IST2024-03-31T18:52:00+5:302024-03-31T18:52:24+5:30
नागरिकांनी वेळेत आपला कर भरून दंडात्मक व्याज आकारणी आणि कटू कारवाई टाळावी असे आळंदी नगरपरिषदेचे आवाहन

आळंदीत करवसुलीसाठी धडक कारवाई; १४ मालमत्ता सील तर ४८ नळ कनेक्शन कट
आळंदी : आळंदी नगरपरिषद मार्फत गेल्या चार महिन्यांपासून मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू असून आर्थिक वर्ष संपत आल्याने मागील दहा दिवसात ही कर वसुली मोहीम नगरपरिषद मार्फत तीव्र स्वरूपात करण्यात आली आहे. या अंतर्गत एकूण १४ मालमत्ता सील करण्यात आल्या असून ४८ नळ कनेक्शन तोडण्यात आले असल्याची माहिती आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
आर्थिक वर्ष २०२३ - २४ मध्ये एकूण ७.५० कोटी (७०%) मालमत्ता कर आणि ५० लाख (३०%) पाणीपट्टी वसुली झाली असून उर्वरित थकीत कर वसुलीसाठी आळंदी नगरपरिषद मार्फत धडक कारवाई करण्यात येत आहे. एप्रिल महिन्यात देखील ही कारवाई सुरूच राहणार आहे. या धडक कारवाईत आळंदी नगरपरिषदेचा संपूर्ण अधिकारी, कर्मचारी वर्ग सहभागी असून वारंवार गृहभेटी देऊन कर भरण्याचे आवाहन करून देखील प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येत आहे.
शासनाकडून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना केवळ नवीन कामांसाठी निधी प्राप्त होतो. देखभाल दुरुस्ती करिता कुठलाही निधी नगरपरिषदांना प्राप्त होत नसून तो नागरिकांच्या करातून जमा होणाऱ्या स्वनिधितून करावा लागतो. त्यामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी नागरिकांनी देखील आपला मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरून आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे. मार्च महिना संपला म्हणून कर वसुली मोहीम थांबणार नसून थकबाकीदारांवर कारवाई सुरूच राहणार आहे.
येत्या २०२४ - २५ या आर्थिक वर्षात १ एप्रिलपासून वर्षभर ही कर वसुली मोहीम सुरू ठेवली जाणार आहे. नागरिकांनी वेळेत आपला कर भरून दंडात्मक व्याज आकारणी आणि कटू कारवाई टाळावी असे आवाहन आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे.