केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात गुरुवारी बारामती एमआयडीसीत संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 11:26 AM2020-11-25T11:26:41+5:302020-11-25T11:27:15+5:30
कामगारांची सेवा सुरक्षा, वेतन सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा धोक्यात
बारामती : कामगार कायद्यात केंद्र सरकारने कामगार विरोधी बदल केले आहेत.केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात गुरुवारी(दि. २६) एमआयडीसीतसंप करण्यात येणार आहे.त्यादिवशी एमआयडीसीत यंत्रांची चाके थांबणार आहेत.
ग्रीव्हज कॉटन अॅण्ड अलाईड कंपनीज एम्प्लॉइज युनियन चे प्रतिनिधी तानाजी खराडे,सचिन चौधर,अशोक इंगळे,हनुमंत गोलांडे,सुनील शेलार यांनी याबाबत माहिती दिली.त्यानुसार कंपनीतील सर्व कामगार बंधू-भगिनींना नोटीसद्वारे संपाची माहिती देण्यात आली आहे. केंद्रातील भाजपा सरकारने देशात कामगार कायद्यामध्ये कामगार विरोधी बदल केलेले आहेत.त्यामुळे कामगारांची सेवा सुरक्षा, वेतन सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे.
कोरोना काळातील शांततेचा फायदा घेऊन संरक्षण, विमा व बँकासारख्या मुलभूत सार्वजनीक क्षेत्रातील उपकम देखील विकून टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. सर्वत्र कंत्राटीकरण सुरू आहे. कोरोना काळात कोटयावधी लोकांचा रोजगार गेलेला आहे. अतिवृष्टी व नापिकीमुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आलेला असताना त्यांना तात्काळ साहय देण्याची गरज आहे. त्याचवेळी शेतकऱ्यांना बड्या जागतिक व्यापारी कंपन्यांच्या दावणीला बांधणारे कायदे देखील केलेले आहेत. सर्व केंद्रीय संघटनांनी पुकारलेल्या संपामध्ये सर्व संघटीत, असंघटीत, कंत्राटी, खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील कामगार मोठया संख्येने सहभागी होणार आहेत. आयटक सहभागी असलेल्या पुणे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समिती या संपामध्ये सहभागी आहे. तरी २६ नोव्हेंबर २०२० रोजी कोणीही कामावर न येता आपल्या न्याय मागण्यांसाठी या संपामध्ये सहभागी व्हावे. त्याच दिवशी ११ वाजता कामगार संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत,अशी माहिती संघटना पदाधिकाऱ्यांनी दिली.
———————————