माथेफिरुने पळवली एसटी, ४ वाहनांना दिली धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 11:46 PM2018-12-17T23:46:24+5:302018-12-17T23:48:10+5:30
भिगवण आगारातील थरार : ४ वाहनांना दिली धडक; नागरिकांनी अनुभवली पुण्यातील सात वर्षांपूर्वीची घटना
भिगवण : येथील आगारात भिगवण-बारामती एसटी बस (एमएच १४-बीटी २९५६) थांबली असताना अचानक एका माथेफिरूने तिचा ताबा घेऊन ती आगारातून पळवून नेली. एसटी सोलापूरच्या दिशेने सर्व्हिस रोडने नेऊन चार वाहनांना धडक दिली. यात वाहनांचा चक्काचूर झाला. यानंतर एसटी सोनाज पंपाशेजारील गटाराच्या ड्रेनेजमध्ये अडकल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली असून यात सुदैवाने कुठलीही जीवित हानी अथवा जखमी झाले नाही. मात्र, या घटनेमुळे ७ वर्षांपूर्वी पुण्यात संतोष माने याने पळवलेल्या एसटीच्या घटनेची आठवण भिगवणकरांना झाली.
भिगवण येथील आगारात भिगवण-बारामती एसटी सहाच्या सुमारास आली. या वेळी चालक एस. आर. सोनवणे आणि वाहक शिवाजी गावडे आगार कार्यालयात गेले. या वेळी माथेफिरू बालाजी गोपाळ रेणके (रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर) याने एसटीत प्रवेश करून एसटी पळवली. ही बस भिगवणकडून सोलापूरच्या दिशेने सर्व्हिस रस्त्याने वेगाने नेऊन महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या पेट्रोलियम गाडीला (एम ४२ एक्यू १६२८) भिगवण पुलाखाली जोरदार धडक दिली. या वेळी त्याने गाडी न थांबवता ती पुढे दामटत या ट्रकपुढे असणाऱ्या तीन वाहनांना धडक दिली. या वेळी पाईप घेऊन चाललेल्या पिकअपला (एमएच ०५-आर ५६२७) बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. यामुळे बस रस्त्यालगत असलेल्या गटाराच्या ड्रेनेजमध्ये अडकली. यामुळे मोठा अनर्थ टळला.
भरगर्दीच्या वेळी सायंकाळी एसटी आगारातून पळवून नेल्याने भिगवण आगारात मोठी खळबळ उडाली होती. चालक आणि वाहक एसटीमागे सुमारे अर्धा किलोमीटर पाठलाग
करीत पळाले.
महाराष्ट्र सुरक्षा बलाचा
कर्मचारी अशोक नागरगोजे याने पळविलेल्या गाडीचा पाठलाग करून बस ओव्हरटेक करून रस्त्यावर असणाºया नागरिकांना आपल्या शिट्टीने सावध करीत बाजूला केले. त्यामुळे जीवितहानी होण्यापासून वाचली.
..तर घडली असती भीषण घटना
भिगवणकरांचे नशीब बलवत्तर असल्यामुळे या माथेफिरूने गाडी सर्व्हिस रस्त्याच्या विरुद्ध बाजूने नेली. ही गाडी जर पुणे बाजूने सोलापूर बाजूला असणाºया मार्गाने नेली असती, तर मोठे अपघात झाले असते.
अपघाताची माहिती मिळताच तातडीने भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्यासह पोलीस गोरख पवार, श्रीरंग शिंदे, सचिन जगताप व एसटी डेपोतील पथकाने तत्काळ अपघातस्थळी येऊन माथेफिरूला ताब्यात घेतले.