लोणी-काळभोरमधील एचपीसीएल कर्मचाऱ्यांचा संप मागे; पेट्रोल पुरवठा सुरळीत
By विवेक भुसे | Published: January 1, 2024 09:39 PM2024-01-01T21:39:05+5:302024-01-01T21:40:03+5:30
केंद्र सरकारने नवा कायदा केला असून त्यात वाहनचालकांकडून अपघात झाला तर त्या अपघाताबद्दल चालकाला १० वर्ष शिक्षा आणि सात लाख रुपये दंड अशी तरतुद केल्याचे सांगण्यात येत आहे.
पुणे : लोणी काळभोर येथील एचपीसीएल कर्मचार्यांनी संप मागे घेतला असून तेथून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहर व परिसरातील सर्व पेट्रोल पंप खुले राहणार असल्याचे ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशने प्रवक्ते अली दारुवाला यांनी सांगितले.
केंद्र सरकारने नवा कायदा केला असून त्यात वाहनचालकांकडून अपघात झाला तर त्या अपघाताबद्दल चालकाला १० वर्ष शिक्षा आणि सात लाख रुपये दंड अशी तरतुद केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याविरोधात पेट्रोल पुरवठा करणार्या इंडियन ऑइल, एचपीसी एल, बीबीसीएल या तिन्ही कंपन्यांच्या टँकर चालकांनी संप पुकारला होता. या संपाला प्रतिसाद देण्यासाठी लोणी काळभोर येथील एचपीसीएलच्या टँकर चालकांनी संप पुकारला होता. त्यामुळे सकाळी लोणी येथून कोणताही टँकर बाहेर पडला नव्हता. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी संबंधित टँकरचालकांशी भेट घेऊन त्यांना नेमका काय कायदा येणार आहे, याची माहिती दिली. त्यांचे समुपदेशन केले. त्यानंतर सायंकाळपासून लोणी येथील केंद्रातून पेट्रोल व डिझेलचे टँकर भरुन पाठविण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, पेट्रोल चालकांच्या संपामुळे पेट्रोलची टंचाई निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरुन नागरिकांनी दुपारपासूनच पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पुण्यासह सर्वच पेट्रोल पंपावर वाहनांचा लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत होत्या. ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी सांगितले की, लोणी काळभोर येथील केंद्रातून पेट्रोलचे टँकर बाहेर पडण्यास सुरुवात झाली असून मंगळवारी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातील पेट्रोल पंप सुरु राहणार आहेत. कोठेही पेट्रोलची टंचाई नाही. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, अकारण जादा पेट्रोल भरुन घेऊ नये.