मंचरमध्ये तणाव, वरवंड येथे लाठीचार्ज
By admin | Published: August 5, 2015 03:08 AM2015-08-05T03:08:07+5:302015-08-05T03:08:07+5:30
मतदान करण्यावरून होणारी बाचाबाची, विरोधक समोरासमोर आल्याने त्यांच्यात झालेली भांडणे, त्यामुळे काही ठिकाणी निर्माण झालेला तणाव, पण पोलिसांनी त्यात तातडीने
पुणे : मतदान करण्यावरून होणारी बाचाबाची, विरोधक समोरासमोर आल्याने त्यांच्यात झालेली भांडणे, त्यामुळे काही ठिकाणी निर्माण झालेला तणाव, पण पोलिसांनी त्यात तातडीने हस्तक्षेप करीत केलेली कारवाई यामुळे मावळमधील घटना वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडले़ अनेक तालुक्यांत मतदानाची वेळ संपल्यानंतरही अनेक ठिकाणी रांगा लागल्याचे दिसून येत होते़ जिल्ह्यात सरासरी ८५ टक्क्यांच्या वर मतदान झाल्याची प्राथमिक माहिती आहे़ दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यात ७३ टक्के मतदान झाले होते़
जिल्ह्यातील जुन्नर, वेल्हा, घोडेगाव, खेड, शिरूर या तालुक्यांतील दुर्गम भागात सकाळपासूनच मतदानाला उत्साह दिसून आला़ अनेक ठिकाणी मतदान सुरूझाल्याबरोबर रांगा लागल्याचे चित्र दिसत होते़ त्यामानाने मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण झालेल्या गावांमध्ये उत्साह कमी दिसून आला़
मंचर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत खासदार आणि आमदारांनी आपली शक्ती पणाला लावल्याने येथे अधिक चुरस दिसून येत होती़ त्यामुळे काही मतदान केंद्रांवर तणाव निर्माण झाला होता़ पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती निवळली़
मतदान सुरू झाल्यानंतर सर्वत्रच उत्साह दिसून आला़ सकाळी मतदानाचा वेग चांगला होता़ अनेक ठिकाणी दुपारी १२ पर्यंतच ५० टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते़ दुपारनंतर हा वेग मंदावला़ सायंकाळी मात्र, त्यात पुन्हा वाढ झाली़
बारामती तालुक्यात साधारण ८८ टक्के मतदान झाले असून, पश्चिम भागात सकाळपासूनच रांगा लागल्याचे दिसत होते़ अनेक ठिकाणी दोन पॅनलमध्ये चुरस दिसून आली़
इंदापूरला शांततेत मतदान
पार पडले़ अनेक ठिकाणी मतदारांना ने-आण करण्यासाठी आलिशान गाड्यांची सोय केल्याचे दिसून येत होते़ इंदापूरच्या पश्चिम
पट्ट्यात तुलनेने मतदानाचा वेग अधिक होता़ अनेक ग्रामपंचायतींत ९० टक्क्यांपर्यंत मतदान झाले़ हगारेवाडीत ९२ टक्के मतदान झाले, तर वालचंदनगरमध्ये सर्वांत कमी ६२ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला़