किर्लोस्कर न्युमॅटिकच्या कामगारांवर लाठीमार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 02:44 AM2018-09-30T02:44:40+5:302018-09-30T02:45:01+5:30
कुटुंबांसहित सत्याग्रह : चर्चा न करण्याची प्रशासनाची भूमिका; १३१ कामगारांना कमी केल्याने आंदोलन
हडपसर : किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनीमधील आंदोलन चिघळले असून प्रवेशद्वारावर कुटुंबांसहित आंदोलन करणाऱ्या कामगारांना पांगविण्यासाठी शनिवारी पोलिसांनी लाठीमार केला. एका महिलेसह ६६ आंदोलकांना ताब्यातही घेण्यात आले आहे. १३१ कामगारांना नोकरीतून कमी केल्याने त्यांनी गेल्या ४१ दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे.
कामगारांनी शनिवारी कुटुंबासहित आंदोलन करण्याचा पवित्र घेतला. प्रवेशद्वारावर आज मोठा पेच निर्माण झाला होता. आंदोलकांनी आतील कामगारांना बाहेर जाण्यासाठी मज्जाव केला. त्यामुळे कंपनी प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी या आंदोलकांशी चर्चा केली. मात्र, आंदोलकांनी आपल्या घोषणा तशाच चालू ठेवल्या. तेथून जाणाºया कचºयाच्या गाडीखाली झोपण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. किर्लोस्कर न्युमॅटिक कंपनीतील किर्लोस्कर न्युमॅटिक कामगार संघटनेतील सर्वच्या सर्व म्हणजे १३१ कामगारांना बडतर्फ केले आहे. त्यामुळे कंपनीच्या समोर या कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत कामगारांना परत कामावर रुजू करून घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष अभिजित आडागळे, उपाध्यक्ष लकन तांबे, जनरल सेक्रेटरी सचिन सुरवसे, अशोक गंजाळ, आंबादास चाकणे, बिपीन कावळे, अजित देवकर यांनी दिला होता.