निवासी उपजिल्हाधिकारी बदलीची जोरदार चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:12 AM2021-03-16T04:12:44+5:302021-03-16T04:12:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुतेक सर्व प्रमुख पदाच्या बदल्या झाल्यानंतर आता निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुतेक सर्व प्रमुख पदाच्या बदल्या झाल्यानंतर आता निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली आहे. शासनाकडून एप्रिल-मे महिन्यात नियमित बदल्या केल्या जातात. दरम्यान कटारे यांच्या बदलीच्या चर्चेसोबतच नवीन आरडीसी कोण येणार याबाबत देखील तर्कवितर्क लावले जात आहे.
शासनाच्या वतीने दर वर्षी एप्रिल-मे महिन्यात प्रशासकीय बदल्या केल्या जातात. परंतु, गतवर्षी कोरोनामुळे प्रशासकीय बदल्या झाल्या नाही. मात्र, जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी बहुतेक सर्व वरिष्ठ पदावरील अधिका-यांच्या बदल्या केल्या. यात ऑगस्ट महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांसह नंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, कुळ कायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकिरी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे चिटणीस अशी अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात काही अधिका-यांच्या नियमबाह्य व मुदतपूर्व देखील बदल्या झाल्या. याच वेळी आरडीसी बदलाची देखील चर्चा होती. परंतु, कटारे यांचा कार्यकाळ पूर्ण झाला नसल्याने ही बदली टळली होती.
आता पुन्हा एकदा आरडीसी बदली चर्चा सुरू झाली आहे. यात डाॅ. जयश्री कटारे यांची एप्रिल महिन्यात बदली होणार असल्याची चर्चा आहे. तर नवीन आरडीसी म्हणून संजीव देशमुख, संजय पाटील, सुनील थोरवे यांच्यासह ज्योती कदम या अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या सर्व अधिकाऱ्यांनी तहसीलदार, उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.यामुळे या सर्व अधिकाऱ्यांना जिल्ह्याची सर्व माहिती असून, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजाचा अनुभव देखील आहे. यामुळे आता नक्की कोण येणार हे बदली नंतरच स्पष्ट होईल.