सायबर पोलिसांची दमदार कामगिरी, सहा महिन्यात फसवणुकीतील ७ कोटी ८७ लाख रुपये रिफंड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 01:03 PM2020-06-27T13:03:49+5:302020-06-27T13:04:15+5:30
लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ..
विवेक भुसे
पुणे : वेगवेगळी कारणे सांगून लोकांच्या माहितीच्या अभावाचा गैरफायदा घेऊन सायबर चोरटे लोकांना लाखो रुपयांना गंडा घालत आहेत. त्याचवेळी या सायबर चोरट्यांनी चोरलेला पैसे परत मिळवून देण्याचे कामही सायबर पोलीस ठाण्याकडून होताना दिसत आहे. गेल्या ६ महिन्या सायबर पोलिसांनी ५३१ जणांचे ७ कोटी ८७ लाख ८४ हजार ७४९ रुपये परत मिळवून दिले आहेत.
अनेकदा आपण गोपनीय क्रमांक शेअर केला नसतानाही सायबर चोरटे आपल्या बँक खात्यावर डल्ला मारुन त्यातील रक्कम आॅनलाईन ट्रान्सफर करतात. अशावेळी आपण तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यास संबंधित बँकेला सायबर पोलीस याची माहिती कळवितात. ज्या खात्यात हे पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहेत. ते खाते गोठविण्यास सांगितले जाते. त्यानंतर बँक ठराविक दिवसानंतर फसवणुक झालेल्या खातेदाराला त्याचे पैसे परत करते. जर खातेदाराने आपला ओटीपी शेअर केला असेल तर अशा फसवणुकीतील रक्कम बँक परत करत नाही. सायबर चोरटे हे प्रामुख्याने आॅनलाईन ट्रान्सफर केलेले पैसे एखाद्या वॉलेटमध्ये पाठवितात. अशावेळी सायबर पोलीस संबंधित वॉलेटच्या कंपनीशी तातडीने पत्रव्यवहार करुन संबंधितांना त्यांची फसवणुक झालेली रक्कम परत मिळवून देते.
डेबिड, क्रेडिक कार्डमार्फत फसवणुक झालेल्या तक्रारीत ४ कोटी ५४ लाख ९९ हजार ४०७ रुपये सायबर पोलिसांनी लोकांना परत मिळवून दिले. डेबिट, क्रेडिट कार्डशिवाय पैसे ट्रान्सफर झालेल्या तक्रारीत १ कोटी १७ लाख ७७ हजार ३५३ रुपये बँक खातेदारांना परत करण्यात आले.
नोकरीच्या आमिषाने अनेक तरुणांची फसवणूक केली जाते. अशा फसवणूक झालेल्या १८९ तक्रारींपैकी बहुतांश तरुणांना ५५ लाख ९४ हजार ६९६ रुपये परत करण्यात आले आहेत.
आपण सायबर चोरट्यांना ओटीपी नंबर शेअर केला असेल तर त्या व्यवहाराची बँक जबाबदारी घेत नाही. त्यामुळे कधीही कोणाला गोपनीय क्रमांक शेअर करुन नका. सायबर चोरट्यांपासून सावध रहा. तरीही यदा कदाचित तुमची फसवणूक झाली तर तातडीने सायबर पोलिसांशी आणि बँकेशी संपर्क साधा, असे आवाहन करण्यात आले आहे.
़़़़़़़़़़़़़
रिफंड
डेबिड, क्रेडिट कार्डच्या फसवणुक ४ कोटी ५४ लाख ९९ हजार ४०७
कार्डशिवायच्या व्यवहारातील फसवणुक १ कोटी १७ लाख ७७ हजार ३५३
नोकरीच्या आमिषाने फसवणूक ५५ लाख ९४ हजार ६९६
एकूण रिफंड ७ कोटी ८७ लाख ८४ हजार ७४९
…...........
८० लाख २४ तासात परत
एका सरकारी कंत्राटदाराने पहाटेच सायबर पोलिसांकडे संपर्क साधून आपल्या खात्यातून ८० लाख रुपये ट्रान्सफर झाल्याची माहिती दिली. त्याच्या खात्यातून पैसे कोठे ट्रान्सफर झाले, याची माहिती घेतल्यावर ते पैसे देना बँकेच्या जयपूर येथील खात्यात ट्रान्सफर करण्यात आले होते. सायबर पोलिसांनी तातडीने या बँकेला सकाळीच ई मेल करुन ते पैसे गोठविण्यास सांगितले व ते परत संबंधितांच्या खात्यात परत करण्यास सांगितले़ पोलिसांच्या पत्रावरुन बँकेने हे पैसे तातडीने परत त्या कंत्राटदाराच्या खात्यात परत केले. याचप्रमाणे कॉसमॉस बँकेवर सायबर दरोडा घालण्यात आला होता.त्यातील १३ कोटी ९२ लाख रुपये हॅनसँग बँकेत हस्तांतरीत झाले होते.सायबर पोलिसांनी हे पैसे गोठविण्यास बँकेला कळविले होते व हाँगकाँग पोलिसांनाही कळविले होते. हॅनसँग बँकेने ते पैसे गोठविले. त्यानंतर कॉसमॉस बँकेने येथील न्यायालयात दावा केल्यावर हे पैसे कॉसमॉस बँकेला परत मिळाले आहेत.