शहरात पावसाची जोरदार हजेरी
By admin | Published: November 23, 2015 12:58 AM2015-11-23T00:58:45+5:302015-11-23T00:58:45+5:30
शहर व परिसरात रविवारी पावसाने हजेरी लावली. दिवसभरात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात १ मिमी पाऊस पडल्याची नोंद हवामानशास्त्र विभागाकडे झाली आहे.
पुणे : शहर व परिसरात रविवारी पावसाने हजेरी लावली. दिवसभरात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात १ मिमी पाऊस पडल्याची नोंद हवामानशास्त्र विभागाकडे झाली आहे. रात्री आठ वाजल्यानंतर शहरात बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता विभागाने वर्तविली आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शहर व परिसरात शनिवारपासून पाऊस पडत आहे. शनिवारी शहरात काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला होता. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपार एक वाजल्यानंतर शहरातील बहुतांश भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झाला. साधारणत: दोन ते अडीच तास हा पाऊस सुरू होता. त्यानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली. पण सात वाजल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने दुचाकी घसरण्याचे प्रकारही घडले. रस्त्यांच्या कडेला सखल भागात पाणी साठले होते. रविवारी सुटीचा दिवस असल्याने फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या पुणेकरांचा या पावसामुळे हिरमोड झाला. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात १ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस शहराच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.