पुण्यातील धरणक्षेत्रांमध्ये दमदार पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 11:33 AM2019-07-28T11:33:15+5:302019-07-28T11:33:49+5:30
गेल्या काही दिवसांपासून पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रांमध्ये चांगला पाऊस हाेत असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे.
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रांमध्ये दमदार पाऊस झाला आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरले असून त्यातून 5136 क्सुसेक्सने मुठा नदीपात्रात पाणी साेडण्यात येत आहे.
गेल्या आठवडाभरापासून पुण्यात पावसाचा चांगलाच जाेर आहे. पावसाच्या जाेरदार सरींमुळे धरणातील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या धरण क्षेत्रांमध्ये जाेरदार पाऊस झाला आहे. गेल्या चाेवीस तासात खडकवासला धरणामध्ये 40 मिलीमीटर पावसाची नाेंद झाली आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरले असून या धरणातून मुठा नदीपात्रात पाणी साेडण्यात येत आहे. त्याचबराेबर गेल्या चाेवीस तासात पानशेत धरणक्षेत्रात 150 मिलीमीटर, वरसगावमध्ये 148 मिलीमीटर तर टेमघरमध्ये मध्ये 122 मिलीमीटर पावसाची नाेंद झाली आहे. यामुळे पानशेत 74 टक्के, वरसगाव 59 टक्के तर टेमघर 53 टक्के भरले आहे. या सर्व धरणांची क्षमता पाहता सध्या 67 टक्के पाणीसाठी जमा झाला आहे. हे प्रमाण गेल्यावर्षी 86 टक्के इतके हाेते.