महिन्यानंतर सराफ आंदोलनावर ठाम
By Admin | Published: March 31, 2016 02:56 AM2016-03-31T02:56:45+5:302016-03-31T02:56:45+5:30
अबकारी कायद्यातील जाचक अटींविरोधात पुण्यातून सुरू झालेल्या सराफ व्यावसायिकांच्या बेमुदत बंद आंदोलनाला गुरूवारी एक महिना पुर्ण होत आहे. आतापर्यंत सराफांनी केलेल्या
पुणे : अबकारी कायद्यातील जाचक अटींविरोधात पुण्यातून सुरू झालेल्या सराफ व्यावसायिकांच्या बेमुदत बंद आंदोलनाला गुरूवारी एक महिना पुर्ण होत आहे. आतापर्यंत सराफांनी केलेल्या आंदोलनामध्ये हे आंदोलन सर्वाधिक काळ चालणारे ठरले आहे. तरीही लहान-मोठ्या सराफ व्यावसायिकांनी एकजुट दाखवत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. अबकारी कायद्यातील जाचक अटी-नियम रद्द झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्यावर सराफ ठाम आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दि. २९ फेब्रुवारी रोजी संसदेत अंदाजपत्रक सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून देशभरातील सराफ संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्याची सुरूवात मात्र पुण्यातून झाली. पुणे सराफ असोसिएशनने तातडीने बैठक घेत दि. १ मार्च रोजी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर हे लोण हळू-हळू राज्यभरात पसरले.
देशभरातील सराफ संघटनांनी या आंदोलनात उडी घेतली. तेव्हापासून सुरू झालेल्या आंदोलन सलग महिनाभर सुरू आहे. अबकारी कायद्याविरूध्द सराफांनी २०१२ मध्येही आंदोलन पुकारले होते. त्यावेळी हे आंदोलन २१ दिवस चालले. त्यानंतर सध्या सुरू असलेले आंदोलन सर्वाधिक काळ चालणारे ठरले आहे. केंद्र सरकारकडून सराफांच्या मागण्यांबाबत अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.
त्यामुळे सराफांनी आपले आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. या आंदोलनामुळे आतापर्यंत एकट्या पुण्यात महिनाभरात हजारो कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
सराफ असोसिएशनचे सचिव अभय गाडगीळ म्हणाले, केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यावर लावलेला एक टक्का कर भरण्यास सराफ तयार आहेत. मात्र अबकारी कायद्यानुसार अबकारी विभागातील अधिकाऱ्यांना जे अधिकार दिले आहेत, त्याला आमचा विरोध आहे. या अधिकारानुसार संबंधित अधिकारी नाहकपणे दुकानात येवून त्रास देवू शकतील.
तसेच अंदाजपत्रकानंतर लगेचच कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. हे चुकीचे असून नुकत्याच स्थापन केलल्या केंद्रीय समितीच्या अहवालानंतर त्यात बदल करून अंमलबजावणी सुरू करायला हवी. सराफांकडे काळा पैसा नाही. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे अशा बुलियनला कायद्यातून बाहेर ठेवण्यात आले आहे. सराफांवर मात्र करही लावण्यात आला आहे. (प्रतिनिधी
आंदोलन सुरू झाल्यापासून पुण्यासह देशभरात मोर्चे, धरणे आंदोलन, रास्ता रोको अशा विविध मार्गाने लढा सुरू ठेवण्यात आला आहे. पुण्यात लाखो सराफांना एकत्रित करून महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनने मोर्चा काढला. कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे अशा सर्वच पक्षांनी सराफांना पाठिंबा दिला आहे. सराफ संघटनांनीही भाजपसह विविध पक्षांच्या नेत्यांना निवेदन देवून मागण्या मांडल्या आहेत. देशभरात ठिकठिकाणी तेथील सराफ विविध मार्गाने आंदोलन करीत आहेत.