चेहऱ्यावर उत्सुकता मनात प्रश्नांचे काहूर
By Admin | Published: December 29, 2016 03:10 AM2016-12-29T03:10:48+5:302016-12-29T03:10:48+5:30
चेहऱ्यावर उत्सुकता, मनात प्रश्नांचे काहूर अशीच काहीशी अवस्था विज्ञान काँग्रेसमध्ये विविध प्रयोग पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची झाली होती. वेगवेगळे नवनवीन प्रयोग
बारामती : चेहऱ्यावर उत्सुकता, मनात प्रश्नांचे काहूर अशीच काहीशी अवस्था विज्ञान काँग्रेसमध्ये विविध प्रयोग पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची झाली होती. वेगवेगळे नवनवीन प्रयोग पाहताना विचारलेले अनेक प्रश्न तर विमान, तारांगण पाहून हरखून गेलेले विद्यार्थ्यांचे चेहरे यामुळे बारामती येथे भरलेल्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमध्ये बुधवारी उत्साहाचे वातावरण होते.
२४ व्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमध्ये दुसऱ्या दिवशी फिल्म शोमध्ये निसर्ग व विज्ञानविषयक विविध माहितीपट दाखविले गेले. तसेच सर्पप्रदर्शनात प्रत्यक्ष साप पाहून त्याची माहिती घेताना मुलांच्या चेहऱ्यावर भीतीयुक्त उत्सुकता दिसून आली. सापांबाबत समाजात असलेले विविध गैरसमज दूर करून साप हा माणसाचा कसा मित्र आहे, याची माहिती या वेळी दिली गेली. (प्रतिनिधी)
वैमानिक करिअरचेही मार्गदर्शन
या प्रदर्शनादरम्यान प्रणव चिट्टे यांनी विमानांच्या साठहून अधिक प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. यात लढाऊ विमानांच्या प्रतिकृती अधिक संख्येने आहेत. यामध्ये जगातील पहिले विमान ज्या राईट बंधूंनी उडविले होते, त्या विमानाचीही प्रतिकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. याशिवाय हेलिकॉप्टरच्या प्रतिकृती येथे आहेत. विमान व विमानतळ म्हणजे काय याचीही माहिती येथे दिली जात आहे. विद्यार्थी व पालकांसाठी दहावी-बारावीनंतर वैमानिक म्हणून काय करिअरच्या संधी आहेत, याचेही मार्गदर्शन येथे केले जात आहे.
भारतीय संस्कृतीचे घडले दर्शन
या प्रदर्शनादरम्यान कतारच्या विद्यार्थ्यांनी एकपात्री प्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. या सांस्कृतिक उपक्रमात हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, दिल्ली व झारखंडच्या विद्यार्थ्यांनी आपली परंपरागत कला सादर करत भारतातील विविधतेचे दर्शन उपस्थितांना घडविले. नृत्य, लघुनाटिका, गीते, समूह गीतगायन, एकपात्री प्रयोगाद्वारे ही विविधता दिसून आली.