पुण्याच्या बशीसारख्या भौगोलिक रचनेमुळे ओढे धोकादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 02:19 PM2019-09-28T14:19:50+5:302019-09-28T14:25:33+5:30
पुण्यात कमी पावसामुळेही पूरस्थिती : प्रवाहात अडथळे आल्याने बसला फटका
- विवेक भुसे-
पुणे : पुण्याची भौगोलिक रचना बशीसारखी आहे. शहराभोवती असलेल्या डोंगरांमुळे ही रचना झाली आहे. डोंगरावरून वाहत येणारे पाणी ओढ्यातून वाहत येऊन मुळा-मुठा नदीला मिळते. त्यामुळे बांधकामांसाठी ओढे गायब केल्यानेच पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
पुण्यामध्ये नदीच्या नव्हे तर ओढ्यांच्या पुरामुळे हाहा:कार माजला. अनेकांचे बळी गेले. याचे मुख्य कारण म्हणजे पुण्याच्या या भौगोलिक रचनेचा विचारच महापालिकेने केला नाही. इतर वेळी ओढे वाहत नसल्याचा फायदा घेऊन त्यावर बांधकामे करण्यात आली. ओढ्यांचे प्रवाह वळविण्यात आले. त्याचा फटका बसला.
पुणे शहर हे एखाद्या बशीसारखे वसले आहे़. शहराच्या तीनही बाजूला डोंगर आहे़. या डोंगरावर पडलेला पाऊस सरळ वाहत नदीच्या दिशेने येतो़. कात्रज भागात २४ सप्टेंबरला तीन तासांत तब्बल ८१ मिमी पाऊस पडला होता़. कात्रज भागातून वाहत आलेले पाणी थेट आंबिल ओढ्यापर्यंत आले होते़.
या पावसाने त्या परिसरातील सर्व पाण्याच्या जागा अगोदरच भरून गेल्या होत्या़. कात्रज तलावही भरून वाहत होता़ त्यामुळे २५ सप्टेंबरला जेव्हा पुन्हा दोन तासांत ७९ मिमी इतका पाऊस पडला़, तेव्हा या पावसाच्या पाण्याला पुढे जाण्यासाठी जागाच नव्हती़. त्यात ओढे-नाले अरुंद होत गेल्याने हे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जागाच राहिली नाही़ त्यामुळे ते जागोजागी तुंबून राहू लागले़ .
नदीच्या दिशेने वाहत येणाऱ्या पाण्याला प्रचंड वेग होता़. पण पुढे जाण्यासाठी जागा नाही आणि आजूबाजूला पसरण्यासाठी जागा नाही, त्यामुळे या वेगाने धावणाऱ्या पाण्याने आपली वाट शोधली़. त्यात जीर्णशीर्ण झालेल्या अनेक सोसायट्यांच्या सीमाभिंती धारातीर्थ पडल्या व पाणी वाट फुटेल तसे धावू लागले़. वाहणाऱ्या पाण्यात मोठी शक्ती असते़. ते आपल्या वाटेत येणाऱ्या सर्वांना आपल्यात सामावून घेत पुढे धावते़. त्याप्रमाणे बुधवारी रात्री घडले़ त्याच्या वाटेत आलेल्या भिंती, वाहने, जनावरे यांना आपल्यात सामावून घेत ते पुढे निघाले़. त्यात मग सोसायट्यांचे आवार होते, तसेच झोपड्या होत्या़.
पुणे शहराच्या भौगोलिक रचनेमुळे तुलनेने पाऊस कमी दिसत असला, तरी तो अतिशय कमी वेळात पडल्याने त्याचा दुष्परिणाम अधिक दिसून आला आहे़. किनारपट्टी भागात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा समुद्रात होत असतो़ पण इथे तसे नसल्याने सर्व पाणी नदीच्या दिशेने येऊ लागते़. त्यामुळे तुलनेने कमी पाऊस होऊनही पुण्यासारख्या
शहरात ते अतिवृष्टीसारखे नुकसानकारक ठरले़.
सिंहगड रस्त्यावरील वडगाव भागातही हाच प्रकार घडला. येथे ओढे असल्याचे आताच्या पावसात निदर्शनास आले आहे. या ओढ्यांवर बांधकामेच नव्हे तर रस्तेही बांधण्यात आले आहेत. प्रयेजा सोसायटीकडे जाणारा रस्ता पावसाने पूर्ण वाहून गेला. येथील ओढ्याला पूर होता. या पाण्याला पुढे जाण्यासाठी जागाच नव्हती.
पुण्यातील लहान-मोठ्या ५५ ओढ्यांवरील अतिक्रमणांबाबत आताच विचार केला नाही तर पुढील काळात पूरस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. पुण्यातील ज्या सोसायट्यांमध्ये पावसाचे पाणी घुसले, त्यांनाही आताच आपल्या भागातील ओढ्यांचे अस्तित्व लक्षात येत आहे. नºहेच्या मानाजीनगर भागातील सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाच ते सहा फूट पाणी होते. धक्कादायक म्हणजे दोन मृतदेहही वाहून आलेले होते. या भागातील एका ओढ्याला एरवी कधी पाणी नसते. त्यामुळे तो अडवला गेला आहे. बुधवारी रात्री ओढ्याला पूर येऊन दोघे जण वाहून गेले.
..............
हवामान विभाग गेले तीन दिवस पुण्यात गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करीत होते़. सलग तीन दिवस पडलेल्या पावसामुळे तसेच गेल्या तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे भूगर्भातील पाणी धारण करण्याची क्षमता पूर्णपणे संपली होती़. त्यामुळे पुणे शहराच्या भौगोलिक रचनेमुळे हा पाऊस मोठा धोकादायक ठरला़ - डॉ़ अनुपम कश्यपी, प्रमुख, पुणे हवामान विभाग.