ज्ञान मिळविण्याची धडपड थांबलीय
By admin | Published: May 12, 2014 03:22 AM2014-05-12T03:22:33+5:302014-05-12T03:22:33+5:30
ज्ञान मिळवण्यासाठी परदेशी जा,याचा फायदा देशाला करून द्या.ज्ञानाच्या कक्षा विस्तृत करा, असे आवाहन करतानाच ज्ञान मिळवण्याची धडपड थांबली आहे,अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली.
पुणे : ज्ञान मिळवण्यासाठी परदेशी जा, ज्ञान घेऊन याचा फायदा देशाला करून द्या. ज्ञानाच्या मर्यादा, ज्ञानाच्या कक्षा विस्तृत करा, असे आवाहन करतानाच ज्ञान मिळवण्याची धडपड थांबली आहे, अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली. ‘मानसोल्लास’ या मराठीतील ग्रंथाच्या प्रकाशन समारंभप्र्रसंगी पुरंदरे बोलत होते. या वेळी पुस्तकाचे लेखक निळकंठ फडके, ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते. पुरंदरे म्हणाले, ‘‘भारतीय लोक आपली परंपरा, आचार-विचार, नृत्यकला, शिल्पकला परदेशात पोहोचवत होते. आता ते थांबले आहे. शिवाजी महाराजांना ज्ञान मिळवण्याची विलक्षण ओढ होती. महाराजांची वृत्ती ज्ञानपिसासू होती. त्यामुळे त्यांचे सैन्य, आरमार सुसज्ज होते. अशी ज्ञानपिसासू वृत्ती आजच्या तरुणांनी अंगी बाणावी. नवीन गोष्ट शिकण्याची, ज्ञान मिळवण्याची धडपड असावी, विलक्षण कुतूहल, जिज्ञासू वृत्ती मुलांमध्ये असावी. जिद्द, चिकाटीशिवाय कोणतेही काम पूर्ण होत नाही. अत्यंत मौल्यवान, मौलिक असे ४०,००० ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत. त्याचा उपयोग ज्ञान वाढविण्याकरिता करायला हवा. यासाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे.’’ निळकंठ फडके यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)