‘ती’च्या आवाजाकरिता संघर्ष सुरूच राहील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 02:02 AM2018-10-02T02:02:51+5:302018-10-02T02:03:27+5:30
बाते अमनकी यात्रेद्वारे जनजागृती : चूल व मूलच्या चौकटीतच आयुष्य
पुणे : जागतिकीकरणाच्या युगात कितीही पुढारलेल्या गप्पा मारल्या तरी पुरुषी मानसिकता विविध क्षेत्रात डोकावतेच. उच्च शिक्षण घेऊनदेखील परंपरागत बेड्यांमध्ये अडकून पडण्याची इच्छा त्या मानसिकतेत दिसून येते. यामुळे देश प्रगतीपथावर असला तरी त्याचा सामाजिक विकास खुंटला जातो. सध्या भारतात स्वतंत्रपणे आपली भूमिका मांडण्यासारखी परिस्थिती नसून ती बदलण्याकरिता तसेच चौकटीत अडकून पडलेल्या महिलांच्या आवाजाकरिता संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे ‘‘बाते अमन की’’ या उपक्रमातील सहभागी महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
२० सप्टेंबर ते १३ आॅक्टोबर दरम्यान देशातील २२ घटकराज्यांमध्ये बाते अमन की उपक्रमाचे निमित्त साधून संवादयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. केरळहून निघालेली ही यात्रा कर्नाटकमार्गे कोल्हापूरला येऊन सोमवारी पुण्यात दाखल झाली. यावेळी संवादयात्रेची माहिती देण्याकरिता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला शबनम हाश्मी, लता भिसे-सोनवणे उपस्थित होत्या. राजकीय दबाव व त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची होणारी गळचेपी याविषयी बोलताना हाश्मी म्हणाल्या, बाते अमनकीच्यानिमित्ताने विविध राज्यांमध्ये प्रवास होत असून त्यानिमित्ताने तेथील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीचा अभ्यास करता येतो. मोदींच्या गुजरातमध्ये पत्रकार परिषद घेतानादेखील खूप तांत्रिकदृष्ट्या औपचारिकतेला सामोरे जावे लागले. सरकारी माध्यमांवर दबाव, कुणी काय खावे, काय बोलावे इतकेच नव्हे, तर कुणी कुठल्या प्रकारचे कपडे घालावेत यावरदेखील बंधने येत असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांच्या समस्यांवर प्रभावी उत्तरे शोधण्याची गरज आहे. त्यांना अद्याप कुटुंबाच्या पारंपरिक चौकटीत बंदिस्त करण्याची पद्धत आजही तितक्याच पुरुषी मानसिकतेने सुरू ठेवली गेली आहे. यावर सखोल विचारमंथन होण्याची गरज आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रविवारी झालेल्या संवादात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी महिलांपेक्षा पुरुषांनाच समानतेचे धडे देण्याची जास्त गरज असल्याचे सांगितले.
संवादयात्रा मुंबईकडे मार्गस्थ होणार
बाते अमन की या संवादयात्रेच्या चमूने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ज्या ठिकाणी हत्या झाली तिथे जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच समाजात ज्ञानाची ज्योत पेटविणारे व समतेचा संदेश देणाºया महात्मा जोतिबा फुले यांच्या वाड्यास भेट दिली. उद्या ही संवादयात्रा मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे.