लग्न, सहली, यात्रांवर 'एसटी 'ची नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 09:06 PM2019-11-08T21:06:36+5:302019-11-08T21:17:44+5:30
एसटी महामंडळाचा महसुलाचा प्रमुख स्त्रोत तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न आहे.
पुणे : उत्पन्न वाढीसाठी तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसुलाबरोबरच लग्न, यात्रा, धार्मिक व शैक्षणिक सहली या करीता प्रासंगिक करारावर एसटी महामंडळाकडून अधिक भर दिला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक विभागीय पातळीवर अधिकारी व पर्यवेक्षक यांची पालक अधिकारी म्हणून नेमणुक केली जाणार आहे. तसेच प्रत्येक आगाराला प्रासंगिक कराराचे उद्दिष्ट निश्चित करून दिले जाणार आहे.
एसटी महामंडळाचा महसुलाचा प्रमुख स्त्रोत तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न आहे. पण त्याचबरोबर प्रासंगिक करार, जाहिराती, गाळे भाडेतत्वावर देणे अशा विविध मागार्नेही महसुल मिळतो. मागील काही वर्षांपर्यंत लग्नकार्य, यात्रा, धार्मिक व शैक्षणिक सहलींसाठी प्रामुख्याने एसटी बसला प्राधान्य दिले जात होते. यातून एसटीला मोठा महसुल मिळायचा. पण आता त्यामध्ये घट झाल्याचे चित्र आहे. यापार्श्वभुमीवर एसटीने पुन्हा प्रासंगिक करारावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने नियोजन करण्यात येत असून विभागीय पातळीवरील अधिकारी, पर्यवेक्षक यांची पालक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच लवकरच आगारनिहाय प्रसंगिक कराराचे उद्दीष्ठे ठरवून दिली जातील. ती उद्दीष्ठे साध्य करण्यासाठी स्थानिक एसटी प्रशासनाने आपल्या स्तरावर प्रयत्न करण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत.
विभागीय स्तरावर मागील आर्थिक वर्षात झालेल्या प्रासंगिक कराराचा आढावा घेऊन ज्या शैक्षणिक संस्थांनी यापूर्वी प्रासंगिक करारावर एसटी बस घेतली होती, अशा संस्थांशी संपर्क साधून शैक्षणिक सहलींसाठी बसेस उपलब्ध करून द्याव्यात. ज्या शैक्षणिक संस्थांनी यापूर्वी एसटी महामंडळाची बस न घेता खासगी बसेस वापरल्या असतील अशा संस्थांशी संपर्क साधून महामंडळाच्या बसेस घेण्याबाबत त्यांना विनंती करावी, आदी सूचना एसटी प्रशासनाने संबंधितांना दिल्या आहेत. प्रासंगिक करारावर बसेस उपलब्ध करून देण्यासाठी कोणतेही बस मार्ग बंद राहणार नाहीत किंवा कामासाठी अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबतही कळविण्यात आल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली.
-----------