एसटीचे पुणे जिल्हा आगार कायमच आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:11 AM2021-02-11T04:11:01+5:302021-02-11T04:11:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एसटी महामंडळाची सुरुवात झाली तेव्हापासून एसटीचे पुणे आगार इतरांच्या तुलनेत कायम आघाडीवर राहिले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एसटी महामंडळाची सुरुवात झाली तेव्हापासून एसटीचे पुणे आगार इतरांच्या तुलनेत कायम आघाडीवर राहिले आहे. राज्यातील महत्त्वाचे ठिकाण असल्याने प्रशासनाकडूनही पुणे आगारातील गाड्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जात असते.
पुणे आगाराच्या एकूण ८५० गाड्या आहेत. त्यातील ८६ वातानूकुलित आहेत. ६६ निमआराम आहेत. ५० गाड्या शिवनेरी आहेत. शिवशाही ४० आहेत. उर्वरित गाड्या साध्या आहेत.
या ताफ्यात एकही गाडी १० वर्षांपेक्षा जास्त वयाची नाही. आरटीओकडून अशा गाड्यांमधून प्रवासी वाहतूक करायला मनाई आहे. त्यामुळे या गाड्या ठेवल्याच जात नाहीत. त्यांचा वापर झालाच तर मालवाहतुकीसाठी म्हणून केला जातो.
या सर्व गाड्या जिल्हांतर्गत तसेच जिल्ह्याबाहेरही धावत असतात. साधारण १० हजार किलोमीटर झाल्यानंतर काही प्रमाणात म्हणजे १०० गाड्यांमागे एका गाडीचा ब्रेकडाऊन मान्य केला जातो. मात्र पुणे आगारात तेही होत नाही. बाहेरून आलेल्या काही गाड्या बंद पडतात, मात्र लगेचच त्यांची दुरूस्ती पुणे आगाराच्या कार्यशाळेत केली जाते व त्या सुरू करून दिल्या जातात. त्यामुळे आगारातून गाडी सुटली व ती मध्येच बंद पडली, प्रवाशांची गैरसोय झाली असे प्रकार नाहीत.
कोरोनाकाळात एसटीच्या सर्वच गाड्या बंद होत्या. त्यानंतर हळूहळू काही मार्ग बरेचसे नियम बंधनकारक करून सुरू झाल्या. आता मात्र सर्व मार्ग व्यवस्थित सुरू आहेत. त्यावर गाड्याही पुरेशा आहे. ८५० पैकी ज्या गाड्या १० वर्षे पूर्ण करतील त्या लगेचच कमी केल्या जातात व तिथे नव्या गाड्या दाखल होतात. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळेच पुणे आगाराची कार्यक्षमता चांगली राहिलेली आहे.
जिल्ह्यात १३ आगार आहेत. राज्यातील सर्व प्रमुख ठिकाणी तिथून गाड्या सुटतात. बाहेरून आलेल्या गाड्यांसह जिल्ह्यातील गाड्यांचीही सर्व ठिकाणी स्वच्छता ठेवली जाते. सर्व ठिकाणच्या कार्यशाळा सर्व साधनसामग्रींनी सुसज्ज आहेत.
खर्च काही लाखांत
प्रत्येक गाडीचे काम वेगळे असते, त्यासाठीचा खर्च वेगळा असतो. त्यामुळे दुरुस्तीसाठी म्हणून वार्षिक खर्च निश्चित असा सांगता येणार नाही. हा खर्च काही लाख रुपये असला तरी तो एकूण उत्पन्नाच्या तुलनेत कमी आहे.
-----
उद्दिष्ट लवकरच गाठणार
कोरोनाच्या आधी आमचे ३ लाख किलोमीटर होते. आता टाळेबंदीनंतर आम्ही २ लाख ७० हजार किलोमीटरचे उद्दिष्ट गाठले आहे. मुंबईत लोकल बंद असल्यामुळे आमच्या काही गाड्या तिकडे गेल्या आहेत. त्या परत आल्या की पूर्ण उद्दिष्ट साध्य करू. ब्रेकडाऊन एकही नाही याचे कारण वर्कशॉपकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. तेथील प्रमुखांसह कर्मचाऱ्यांचे काम यामागे आहे.
- रमाकांत गायकवाड, पुणे जिल्हा नियंत्रक