जिद्दीला तोड नाही! दृष्टिहीन सौरवला बारावीला ८८ टक्के; विद्यार्थ्यांसमोर नवा आदर्श निर्माण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 01:02 PM2023-05-26T13:02:56+5:302023-05-26T13:03:06+5:30
सौरवने कोणत्याही प्रकारचे खाजगी क्लासेस न लावता स्वअभ्यास करत बारावी परीक्षेची तयारी केली
पुणे : सौरव हा जन्मतः अंध आहे. त्यामुळे त्याचे भविष्यात काय हाेणार?, यासह इतर अनेक प्रश्न आमच्यासमोर उभे होते. अनेकांनी आम्हाला त्याला अंधशाळेत टाका असा सल्ला दिला. त्यानुसार आम्ही अंध शाळेत चौकशीही केली परंतु आम्हाला तिथले वातावरण पटले नाही. त्यानंतर आम्ही त्याला अंधशाळेत न टाकता, सामान्य विद्यार्थ्यांच्या शाळेत प्रवेश घेतला. ताे लहानपणापासून जिद्दी आहे. हीच जिद्द मनाशी बाळगून त्याने बारावीला ऑनलाईन व्हिडीओ आणि ऑडिओ तसेच पुस्तकांमधून अभ्यास केला आणि ८८ टक्के गुण घेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण केला.
सौरवने कोणत्याही प्रकारचे खाजगी क्लासेस लावले नव्हते. स्वअभ्यास करीत बारावी परीक्षेची तयारी केली. त्याने ८८ टक्के गुण घेतल्याने त्याचा आत्मविश्वास वाढला असून, पुढे आयटी क्षेत्रात काम करायचे आहे, ताे यशस्वी व्हावा यासाठी आजवर ज्या शिक्षकांनी त्याला मदत केली, त्या सर्वांचे मी खूप आभारी आहे, असे आई प्रीती हेगडे यांनी सांगितले.
वडील गजानन हेगडे म्हणाले, यश हे सहज मिळत नाही त्यासाठी कष्ट करावे लागतात. आम्ही प्रत्येक गोष्टीत साैरवला पाठिंबा दिला आहे. आपली मुलं स्वप्न बघत असतात. पालकांनी नेहमी आपल्या मुलांसोबत उभे राहणे गरजेचे आहे. त्यामुळे मुलांचे मनोबल वाढते आणि मुलं यशस्वी होतात. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांनी कायम संयम ठेवला पाहिजे. आपल्या मुलांबरोबर राहावे. साैरवच्या यशाचा आम्हाला खूप अभिमान वाटत आहे.