अट्टल दरोडेखोरांना अटक
By admin | Published: February 1, 2016 12:40 AM2016-02-01T00:40:22+5:302016-02-01T00:40:22+5:30
गेली दीड वर्ष जेजुरी व परिसरात दुचाकी वाहने अडवून लूटमारीचे सत्र सुरूहोते. जेजुरी पोलिसांनी विशेष पथक तयार करून, अट्टल तीन दरोडेखोरांना ताब्यात घेऊन त्यांनी केलेले सहा
जेजुरी : गेली दीड वर्ष जेजुरी व परिसरात दुचाकी वाहने अडवून लूटमारीचे सत्र सुरूहोते. जेजुरी पोलिसांनी विशेष पथक तयार करून, अट्टल तीन दरोडेखोरांना ताब्यात घेऊन त्यांनी केलेले सहा गुन्हे उघडकीस आणून या दरोडेखोरांकडून आठ दुचाकी व सुमारे चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असल्याची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी दिली.
पुरंदर तालुक्यातील माळशिरस, वाघापूर, पारगाव, मावडी, शिवरी, आदी ग्रामीण परिसरात गेल्या एक ते दोन वर्षांपासून निर्जन ठिकाणी रस्त्यावर दुचाकी वाहने अडवून लूटमार करण्याचे सत्र सुरूहोते. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.जयदेव जाधव, अप्पर अधीक्षक तानाजी चिखले, उप अधीक्षक अशोक भरते, पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी लूटमारीचे सत्र थांबविण्यासाठी व गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी विशेष पथक तयार केले.
स.पो.नी.वाकोडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले, पो.हवालदार शिवा खोकले, रणजित निगडे, विशाल जावळे, संतोष अर्जुन, अक्षय यादव, सचिन पड्याळ या पथकाने कुविख्यात दरोडेखोर देवानंद संतोष राठोड ( वय २०), पिपलरुशी अविनाश राठोड (वय २०) व भीष्म संतोष राठोड (वय २२) (सर्व जण रा. जेजुरी) यांना जेरबंद केले होते. या दरोडेखोरांनी लूटमार केलेले सहा गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. या दरोडेखोरांकडून आठ दुचाकी व सव्वाचार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
दरोडेखोरांनी पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून आठ दुचाकी चोरल्या असून, या गाड्यांच्या मालकांचा शोध पोलीस घेत आहेत. या दुचाकींची माहिती पुढीलप्रमाणे- निळ्या रंगाची बजाज पल्सर एमएच १२ ईके-७९६५, पांढऱ्या रंगाची हिरो होंडा एमएच १२ केएम २२७५, बजाज प्लॅटीना एमएचक्यू ६४८८, काळ्या रंगाची हिरो होंडा स्पेंल्डर, बजाज पल्सर एमएच १४ ए.जे. ३९१६, आदी दोन गाड्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. ( वार्ताहर)