पुण्यात अडकलेले विद्यार्थी स्वगृही रवाना; स्वारगेट बस स्थानकातून १८ विद्यार्थी पाठवले नगरला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 04:20 PM2020-05-07T16:20:53+5:302020-05-07T16:26:58+5:30
जिल्हा प्रशासनासमोर अजून पुण्यात अडकून पडलेल्या सुमारे ४ ते ५ हजार विद्यार्थ्यांना घरी पाठवण्याचे मोठे आव्हान
पुणे: कोरोनामुळे पुण्यात अडकून पडलेल्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वगृही पाठवण्यास सुरुवात झाली असून गुरुवारी स्वारगेट बस स्थानकातून १८ विद्यार्थ्यांना अहमदनगरकडे रवाना करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने केलेल्या सहकार्यामुळे गुरूवारी राज्यातील पहिली विद्यार्थ्यांची बस पुण्यातून रवाना झाली. मात्र, सुमारे ४ ते ५ हजार विद्यार्थी पुण्यात अडकून पडले असून त्यांना घरी पाठविण्यात मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.
कोरोना विषाणूचा वाढत चाललेला फैलाव रोखण्यासाठी केंद्र शासनातर्फे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्याचप्रमाणे राज्य शासनातर्फे जिल्हाबंदी व संचारबंदीचे आदेश काढण्यात आले. त्यामुळे पुणे शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थी अडकून पडले आहेत.या विद्यार्थ्यांना सुमारे ४५ दिवसातहून अधिक कालावधीपासून विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मोफत फूड पॅकेट वितरण करण्यात आले. परंतु, लॉकडाऊनचा कालावधी वाढत चालल्यामुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे . त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांना पैसे संपल्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे अवघड झाले. त्यामुळे एमपीएससी स्टुडंट्स राइट्स या संघटनेसह विविध विद्यार्थी संघटनांनी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडे अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी सोडावे, अशी मागणी केली होती . त्याचप्रमाणे बुधवारी विद्यार्थ्यांची मागणी ट्विटर ट्रेंडद्वारे शासनापर्यंत पोहचविण्यात आली. तसेच जिल्हा प्रशासनाकडे सृजन फाउंडेशन व एमपीएससी स्टुडंट्स राइट्स संघटनेने केलेल्या पाठपुराव्यानंतर गुरुवारी 18 विद्यार्थी स्वारगेट बस स्थानकातून अहमदनगर जिल्ह्यात पाठविण्यात आले. त्यासाठी ''स्टडी सर्कल'' चे आनंद पाटील यांनी आर्थिक सहकार्य केले.
एमपीएससी स्टुडंट्स राईट्स विद्यार्थी संघटनेचे महेश बढे म्हणाले , काही दिवसांपूर्वी २ हजार ३०० विद्यार्थ्यांची यादी पुणे विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आली होती . सर्वाधिक कोरोना प्रभावित क्षेत्र वगळून इतर परिसरातील ४३ विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना गुरूवारी सकाळी 11 वाजता स्वारगेट बस स्थानकावर उपस्थित राहण्याबाबत कल्पना देण्यात आली होती.परंतु, अनेक विद्यार्थी उपस्थित राहिले नाही. त्यामुळे अठरा विद्यार्थ्यांना स्वारगेट बस स्थानकातून बसमधून पाठविण्यात आले. विद्यार्थ्यांची आरोग्यविषयक तपासणी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांना अहमदनगरला पाठविले.
----------
जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीमधून सुमारे ४०-४५ विद्यार्थ्यांची यादी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आली होते. नगर जिल्हाधिकारी कार्यालयाने पुण्यातील विद्यार्थ्यांना अहमदनगरमध्ये येण्यास परवानगी दिल्यानंतर गुरुवारी सकाळी 18 विद्यार्थ्यांना स्वारगेट बस स्थानकातून पाठविण्यात आले. - विवेक जाधव, तहसीलदार
------------
सुमारे चार ते पाच हजार विद्यार्थी पुण्यात अडकून पडले आहेत. कोणत्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पुण्यातून केव्हा पाठविले जाणार आहे; त्यासाठी काय करावे लागेल, याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र लिंकवर प्रसिद्ध करावी.त्यामुळे गोंधळ होणार नाही.तसेच विद्यार्थ्यांना घरी पाठवणे सोईचे होईल, अशी मागणी महेश बढे यांनी केली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांची स्वारगेट किंवा इतर कोणत्याही बस स्थानकावरून पाठविण्याची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे विनाकारण विद्यार्थ्यांनी बस स्थानकावर गर्दी करु नये, असे आवाहनही बढे यांनी केले आहे.