कर्जावरील व्याज न दिल्याने विद्यार्थ्याचे केले अपहरण, आठ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 04:47 PM2021-05-23T16:47:40+5:302021-05-23T16:47:49+5:30
पाच दिवस ठेवले होते डांबून
धनकवडी: कर्जावरील व्याज न दिल्याने एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला डांबून ठेऊन मारहाण करण्यात आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी अनिकेत राज (वय २४, रा.कात्रज) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार गिरीष कदम, दिपक प्रदिपकुमार सिंग, गणेश मानकर, नखील नंदकुमार कदम, (रा. कात्रज) व त्याचे तीन ते चार साथीदार यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. यातील दिपक सिंग व नखील कदम यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना गिरीष कदम यांच्या स्टेन्जा हॉस्टेल व दिपक सिंग यांच्या सुभाष टेरेमधील सदनिकेत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. त्याने यातील एका आरोपीकडून एक लाख व दुसऱ्याकडून चाळीस हजार रुपये कर्जाऊ घेतले होते. दर महिन्याला वीस हजार रुपये परत देण्याच्या अटीवर हे पैसे घेतले होते. मात्र लॉकडाऊनमुळे त्याला पैसे परत करता आले नाही. त्याने मुद्दल दिली होती, मात्र व्याज देता आले नाही. यामुळे त्याला १८ मे रोजी आरोपींनी अपहरण करुन स्टेन्जा हॉस्टेलमध्ये डांबून ठेवले. यानंतर तेथून एका सदनिकेत नेऊन डांबले. तेथे त्याला शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली. त्याने पैशासाठी वडिलांना फोनवर संपर्क साधला, तसेच डांबून ठेवले असल्याचे सांगितले. यानंतर त्याच्या वडिलांनी पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. त्यानूसार पोलिसांनी अनिकेतची सुटका करुन दोघा आरोपींना अटक केली.