बोर्डिंगमधील विद्यार्थ्याचे अपहरण
By Admin | Published: October 14, 2016 05:23 AM2016-10-14T05:23:38+5:302016-10-14T05:23:38+5:30
येथील कस्तुरबा बोर्डींगमधील सोळा वर्षीय विद्यार्थ्याचे गेल्या मंगळवारी (दि. ४) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार
इंदापूर : येथील कस्तुरबा बोर्डींगमधील सोळा वर्षीय विद्यार्थ्याचे गेल्या मंगळवारी (दि. ४) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार इंदापूर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.
जागेश पोपट निकम (वय १६, रा. आढेगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे वडील पोपट जगन्नाथ निकम यांनी तशी फिर्याद इंदापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झेरॉक्स काढण्यासाठी जागेश त्याच्या लहान भावाला सांगून बोर्डींगमधून बाहेर पडला.तो अद्यापपर्यंत परतला नाही. पुणे, हडपसर, कुरकुंभ, भिगवण, अकलूज, बावडा आदी ठिकाणी त्याचा शोध घेण्यात आला. मात्र तो मिळून आला नाही, असे फियार्दीमध्ये नमूद केले आहे.
जागेश पोपट निकम याची उंची १५० सेंमी आहे. सावळा वर्ण, काळे केस, सरळ नाक, गोल चेहरा, अंगात फिकट निळ्या रंगाचा फुल शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पँट, पायात पांढऱ्या रंगाचा सॅन्डल आहे. अशा वर्णनाचा विद्यार्थी दिसून आल्यास इंदापूर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन तपासी अंमलदार हवालदार रशीद पठाण यांनी केले आहे.