सलग 14 तास अभ्यास करुन विद्यार्थ्यांनी साजरी केली वैचारीक जयंती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 04:19 PM2019-04-14T16:19:41+5:302019-04-14T16:20:54+5:30
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्याेतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना अभिवादन करत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सलग 14 तास अभ्यास करुन या महामानवांची संयुक्त जयंती साजरी केली.
पुणे : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्याेतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना अभिवादन करत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सलग 14 तास अभ्यास करुन या महामानवांची संयुक्त जयंती साजरी केली. महामानवांना डाेक्यावर नाहीतर डाेक्यात घ्या हा संदेश विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून दिला. यावेळी विविध विषयांवरील तसेच आंबेडकरांवरील पुस्तके देखील विद्यार्थ्यांना वाटण्यात आली. फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी व इतर प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे काैतुक केले.
गेल्या अनेक वर्षांपासून फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त सलग 14 तास अभ्यास करण्याचा उपक्रम राबविण्यात येताे. आंबेडकरांना पुस्तके सर्वात प्रिय हाेती. आंबेडकरांकडे स्वतःचे ग्रंथालय हाेते, ज्यात 50 हजारांहून अधिक पुस्तके हाेती. आंबेडकर 18 तास अभ्यास करत असत. आंबेडकरांचा हा आदर्श घेत विद्यार्थ्यांनी 14 तास अभ्यास करुन त्यांच्या विचारांना अभिवादन केले. तसेच आंबेडकरांनी महात्मा फुले यांना आपले गुरु मानले हाेते. फुलेंनी दिनदलितांसाठी शिक्षणाची दारं उघडून दिली. या दाेन्ही महापुरुषांच्या कार्याचे स्मरण करत हा उपक्रम राबवून वैचारीक जयंती साजरी करण्यात आली.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या सी 6 या हाॅलमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांबराेबरच विद्यार्थिनींची संख्या देखील अधिक हाेती. विद्यार्थ्यांना माेफत नाश्ता देखील यावेळी देण्यात आला. विविध पुस्तकांचे प्रदर्शन देखील भरविण्यात आले हाेते.