Sharad Pawar: विद्यार्थ्यांच्या रकमा थकित, तरीही आर्थिक बोजा वाढवतात; शरद पवारांची ‘लाडकी बहिण’ चे नाव न घेता टीका
By राजू इनामदार | Updated: August 19, 2024 16:21 IST2024-08-19T16:21:01+5:302024-08-19T16:21:53+5:30
शिक्षणसंस्थांमध्ये सरकारकडून विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ देण्यासंबधीच्या रकमा थकलेल्या आहेत

Sharad Pawar: विद्यार्थ्यांच्या रकमा थकित, तरीही आर्थिक बोजा वाढवतात; शरद पवारांची ‘लाडकी बहिण’ चे नाव न घेता टीका
पुणे: ‘रयत व अन्य काही शिक्षणसंस्थांमध्ये सरकारकडून विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ देण्यासंबधीच्या ज्या योजना आहेत, त्याच्या बऱ्याच मोठ्या रकमा थकलेल्या आहेत असे संस्थाचालकांनी सांगितले. असे असताना नव्याने आर्थिक बोजा वाढवला जात आहे’ अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या बहुचर्चित योजनेचे नाव न घेता केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्ऱ्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना ‘वन नेशन वन इलेक्शन’ असे सांगितले. दुसऱ्याच दिवशी निवडणूक आयोगाने त्याच्या बरोबर विसंगत कृती केली. चार राज्यांमधील निवडणूकाही ते एकाच वेळी घेऊ शकत नाहीत. लाडकी बहीण योजना फक्त महाराष्ट्रात आहे. असे पवार यांनी सांगितले. आमचा पक्ष चारही राज्यातील निवडणूक लढणार आहे असेही ते म्हणाले.
मोदी बाग या आपल्या निवासस्थानी सोमवारी सकाळी पत्रकारांबरोबर बोलताना पवार यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले. अलीकडे अजित पवार भाषणांमध्ये सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका करायला नको होती असे म्हणत आहेत, याकडे लक्ष वेधल्यानंतर पवार म्हणाले, ते असे काही म्हणाल्याचे मी ऐकलेले नाही. बारातमीमधून विधानसभा लढण्यात रस नाही हे त्यांचे वक्तव्यही मी ऐकलेले नाही. मात्र सार्वजनिक जीवनात अनेक निवडणूक लढवलेल्या व्यक्तीला त्याचे मत व्यक्त करण्याचा किंवा निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
मराठा आरक्षण प्रश्नावर संभाजी भिडे आरक्षण कशाला असे म्हणाले हा प्रश्न अर्धवर ऐकल्यानंतरच लगेचच पवार यांनी काहीही प्रश्न का विचारता, त्यांच्यावर बोलावे असे काही त्यात आहे का? असा प्रतिप्रश्न केला. या प्रश्नावर नाराज होत त्यांनी लगेचच पत्रकार परिषद संपवली व ते उठून निघून गेले.