Rajyaseva Main Exam: आता रठ्ठा मारता येणार नाही, अभ्यासच करावा लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 02:16 PM2022-06-26T14:16:31+5:302022-06-26T14:16:45+5:30
राज्यसेवा आयाेग परीक्षा बदलावर विद्यार्थी खूश
पुणे : राज्यसेवा आयाेगाची मुख्य परीक्षा वर्णनात्मक (डिस्क्रिप्टिव्ह) करण्यात आली आहे. त्यामुळे ‘घाेका व ओका’ तसेच रठ्ठामार पध्दतीला चाप बसणार आहे. नवीन परीक्षा पध्दती ही विद्यार्थ्यांची आकलनक्षमता, विश्लेषण क्षमता, विचारक्षमता यावर आधारित असल्याने त्यामुळे गुणवत्ता असलेलेच अधिकारी हाेतील. तसेच यामुळे केंद्रीय लाेकसेवा आयाेगाच्या परीक्षेत मराठी विद्यार्थ्यांचा टक्का वाढेल. त्यामुळे ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया सध्या राज्यसेवेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिली.
केंद्रीय लाेकसेवा आयाेगाच्या परीक्षेच्या धर्तीवर राज्यसेवा आयाेगाने या परीक्षेत बदल केला आहे. राज्यसेवेच्या मुख्य लेखी परीक्षेत वर्णनात्मक पद्धत २०२३ पासून लागू केली आहे. यामुळे ‘एमपीएससी’ व ‘यूपीएससी’च्या परीक्षेत बहुतांश साम्यता येत असल्याने विद्यार्थ्यांना यूपीएससी करणेदेखील साेपे जाईल. परिणामी, यूपीएससीमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत हाेईल.
याबाबत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा बीडचा तुषार डामसे हा विद्यार्थी म्हणाला की, हा पॅटर्न राज्यात लागू करण्याची मागणी आधीपासून करण्यात येत हाेती. परीक्षेत झालेला बदल हा क्लास वन, क्लास टू च्या पदासाठी याेग्य आहे. लेखीद्वारे उमेदवाराची क्षमता चाचणी कळते. यामुळे मराठी विद्यार्थी एमपीएससीसह यूपीएससीचीही परीक्षा देऊ शकतील.
''आधीच्या परीक्षेचे स्वरूप खूप वस्तुनिष्ठ हाेते. त्यामुळे मुले सेल्फ स्टडी करून पास हाेत असत. मात्र, आता विश्लेषणात्मक अभ्यास करावा लागेल व त्याला वेळ लागेल. तसेच आधीपासून जे अभ्यास करत आहेत त्यांना हा निर्णय अंगवळणी पडायला वेळ लागेल. मात्र, फ्रेशरसाठी ताे याेग्य ठरेल. यामुळे क्लासचालकांना अधिक मागणी वाढून ते अधिक महागडे हाेतील असे कोल्हापूरच्या रसिका माळुमल यांनी सांगितले.''
''राज्यसेवा परीक्षेचा बदललेला पॅटर्न याेग्य आहे. यामुळे रठ्ठा करून पास हाेण्यापेक्षा चांगले आहे. जुन्या विद्यार्थ्यांना त्रास हाेईल; पण हा निर्णय याेग्य आहे. केंद्रात मराठी अधिकाऱ्यांचा टक्का वाढेल स्वप्नील कोतवाल म्हणाला आहे.''
''जे विद्यार्थी यूपीएससीचा अभ्यास करत होते, त्यांना फायदा होणार आहे; पण जे एमपीएससीचा अभ्यास करायचे त्यांना अवघड जाईल. आता केवळ रठ्ठा मारता येणार नाही. अभ्यासच करावा लागणार असल्याचे मत कऱ्हाडच्या रुचा शहाने व्यक्त केले आहे.''