मराठी भाषा संकुलासाठी विद्यार्थी संघटना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:16 AM2020-12-30T04:16:10+5:302020-12-30T04:16:10+5:30
विद्यापीठातील विविध विभागांचे रुपांतर संकुलामध्ये केले आहे. त्यात मराठी विभागाचा समावेश स्कूल ऑफ इंडियन लँग्वेजमध्ये केला आहे. मात्र,भारतीय भाषा ...
विद्यापीठातील विविध विभागांचे रुपांतर संकुलामध्ये केले आहे. त्यात मराठी विभागाचा समावेश स्कूल ऑफ इंडियन लँग्वेजमध्ये केला आहे. मात्र,भारतीय भाषा संकुलात मराठी विभागाचा समावेश केल्यास मनसे शांत राहणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी विद्यापीठाला दिला. त्याचप्रमाणे मराठी भाषेला दुय्यम स्थान दिल्यास सहन केले जाणार नाही, असेही यादव यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठात मराठी भाषा भवन उभारून मराठी भाषेचा अभ्यास स्वतंत्रपणे व्हावा या मागणीसाठी या पूर्वी अनेक विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाला निवेदन दिले. मात्र, अद्याप विद्यापीठाने स्वतंत्र भाषा भवन निर्मितीचे काम पूर्ण केले नाही. त्यामुळे विद्यापीठाला भाषेबाबत अनास्था आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
--
विद्यापीठात मराठी भाषा भवन स्थापन करून त्यातून मराठी भाषेचा, साहित्य व वाड्.मय अभ्यास व्हावा. याबाबत शिवसेनेच्या वतीने २०१४ पासून पाठपुरावा केला जात आहे. मात्र, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत राहिले. मराठी भाषेच्या विकासासाठी आणि उत्कर्षासाठी स्थापन झालेल्या पुणे विद्यापीठत मराठी भाषेच्या अभ्यासासाठी स्वतंत्र संकुल उभे करण्यास जागा मिळत नसेल तर ते खेदजनक आहे. त्यामुळे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत त्यांच्याशी चर्चा करून विद्यापीठात मराठीसाठी स्वतंत्र केंद्र उभे करण्याची मागणी केली जाईल.
- किरण साळी, शिवसेना, उपशहर प्रमुख