विद्यार्थी पासचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 01:52 AM2018-06-20T01:52:16+5:302018-06-20T01:52:16+5:30

नुकतीच उन्हाळी सुटी संपून शाळा सुरू झाल्या आहेत. महाविद्यालयातील वर्गदेखील सुरू झाले आहेत.

Student pass schedules collapsed | विद्यार्थी पासचे नियोजन कोलमडले

विद्यार्थी पासचे नियोजन कोलमडले

Next

बारामती : नुकतीच उन्हाळी सुटी संपून शाळा सुरू झाल्या आहेत. महाविद्यालयातील वर्गदेखील सुरू झाले आहेत. त्यामुळे एसटी बसने येणाऱ्या विद्यार्थ्यांची मासिक पास काढण्यासाठी तोबागर्दी होत आहे. मात्र, बारामती आगारात एसटी प्रशासनाच्या नियोजनाअभावी पास काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या होत्या.
मंगळवारी (दि. १९) पास काढण्यासाठी आलेले विद्यार्थी, पालकांमध्ये जोरदार भांडणे झाली. नियोजनाअभावी सर्वत्र आरडाओरड, गोंधळाचे वातावरण होते. भांडण झाल्याने काही विद्यार्थिनींना अक्षरश: रडू कोसळले. मात्र, यावेळी एसटी बसस्थानकात असलेल्या पोलिसांकडे या विद्यार्थिनींनी धाव घेतली. हा प्रकार समजल्यानंतर पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी धाव घेत संबंधितांना समज दिली. त्यानंतर येथील गोंधळ थांबला.
एसटीची भाडेवाढ झाली आहे. एसटीच्या तिकिटासह पासाचे दरदेखील १८ टक्के वाढले आहेत. त्यामुळे वाढलेल्या पासच्या दराबाबत अनेक विद्यार्थी गोंधळलेले होते, तर काही विद्यार्थ्यांनी पास काढण्यासाठी हेलपाटे मारावे लागत असल्याची तक्रार केली. यावेळी उपस्थित पालक, विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना याबाबत संतप्त भावना व्यक्त केल्या. या ठिकाणी सुरक्षारक्षक, रांगा लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, पंख्याची सोय, मुला-मुलींसाठी स्वतंत्र रांगा, पास केंद्रामध्ये आणखी खिडक्यांची सुविधा द्यावी आदी मागण्या पालकांसह विद्यार्थ्यांनी केल्या. गेल्या चार दिवसांपासून एसटी पास मिळविण्यासाठी हेलपाटे मारत असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.
पालक ज्ञानेश्वर साखरे यांनी सांगितले, की सकाळपासून मुलांचे पास काढण्यासाठी रांगेत थांबलो आहे. कर्मचारी उर्मटपणे उत्तर देत आहेत. १२ वाजता अर्ज संपले आहेत, दुपारी २ वाजता या असे सांगत आहेत. अर्जाचे नियोजन करणे आवश्यक होते. अर्जाची किंमत ५ रुपये असताना १० रुपये आकारणी केली जात आहे.
निखिल भगत या विद्यार्थ्याने सांगितले, की पास काढण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. याबाबत विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. रविना होळकर या विद्यार्थिनीने पूर्वीप्रमाणेच महाविद्यालयाच्या ठिकाणी पास देण्याची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली. तनुजा दराडे या विद्यार्थिनीने मुलींसाठी स्वतंत्र रांग असावी, असे मत व्यक्त केले. अजित मोरे या विद्यार्थ्याने पास काढण्यासाठी जलद यंत्रणा उभारावी, त्यामुळे वाद होणार नाहीत, असे मत व्यक्त केले.
पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागलेल्या असताना पाठीमागील दाराने पास दिले जात असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. दिवसभर पास मिळविण्यासाठी अनेक विद्यार्थी, पालक अक्षरश: उपाशी उभे
होते. यावेळी ओळखीच्या काही जणांना पास काढण्यासाठी पाठीमागच्या दाराने प्रवेश दिला जात होता. यावर विद्यार्थी, पालकांनी नाराजी व्यक्त केली.
>सायंकाळी उशिरा घरी जाणे असुरक्षित
सोमवारी पास काढण्यासाठी दिवसभर थांबावे लागले. सायंकाळी उशिरा पास मिळाले. पालक उशिरा थांबू शकतात. मात्र, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिलांना सायंकाळी उशिरा घरी जाणे असुरक्षित आहे, तर काही पालकांना कामावर दांडी मारून, रजा काढून पास काढण्यासाठी थांबावे लागते. पास जलदगतीने मिळण्यासाठी नियोजन होणे आवश्यक आहे, असे पालक उमा साळुंके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
>मदतीसाठी विद्यार्थिनींचे पोलिसांंना साकडे
काही आडदांड पालकांनी दमदाटी केल्यानंतर होळ (ता. बारामती) येथील दोन विद्यार्थिनी घाबरून गेल्या. त्या विद्यार्थिनी रांगेतून बाहेर पडल्या. एसटी बसस्थानकातील पोलीस मदत केंद्रातील उपस्थित पोलीस कर्मचारी गोरख मलगुंडे यांना विद्यार्थिनींनी हा प्रकार सांगितला. पोलीस मलगुंडे यांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली. तुम्ही वयाने मोठ्या आहात, या मुली तुमच्या मुलीच्या वयाच्या आहेत. त्यांना समजून समजुतीने घ्या, मोठ्या माणसांनीच असे वागायचे म्हटल्यावर काय होईल, अशा शब्दांत मलगुंडे यांनी संबंधित पालकांना समज दिली. त्यावर अरेरावी करणारी महिला निरुत्तर झाली. विद्यार्थ्यांनी ‘थँक्यू सर’ असे म्हणत पोलिसांचे आभार मानले. पोलीस कर्मचारी मलगुंडे यांनी पास केंद्रावर एसटीचे स्वतंत्र सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी केली.
>कोणाला सांगायचंय त्याला सांग, चल निघ इथून...
विद्यार्थी पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गर्दी होती; मात्र या गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र होते. दोन खिडक्यांसाठी पाच रांगा झाल्या. उकाड्याने हैराण झाल्याने सर्वच जण घामाघूम झाले होते. त्यातच मुला-मुलींची रांग एकत्रित होती.
यावेळी उशिरा आलेल्या काही महिला, पुरुष पालकांनी रांगेत घुसण्याचा प्रयत्न केला. रांगेत घुसताना विरोध करणाºया विद्यार्थिनींना या आडदांड महिला पालकांनी शिवीगाळ केली. कोणाला सांगायचंय त्याला सांग, चल निघ इथून, अशा भाषेत विद्यार्थ्यांना काही आडदांड पालकांनी अरेरावी केली. यावेळी काही वयोवृद्ध महिलांनादेखील दमबाजी करण्यात आली.
>महाविद्यालयात पास केंद्र पुन्हा सुरू करा
बारामती एसटी आगाराच्यावतीने यापूर्वी महाविद्यालयाच्या ठिकाणी एसटी पास काढण्याची सुविधा उपलब्ध होती. यामध्ये केंद्रनिहाय तारखा ठरवून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी बारामतीला जाण्याची गरज नव्हती. ठरलेल्या तारखेला महाविद्यालयाच्या ठिकाणीच पास उपलब्ध होत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगली सोय उपलब्ध होती.शहर, तालुक्यातून पास काढण्यासाठी एकच गर्दी होते. ही सर्व गर्दी एकाच वेळी, एकाच दिवशी आल्यास एसटी प्रशासनावर ताण येतो. येथील पास देणारी यंत्रणा कोलमडून पडते. त्यासाठी पूर्वीप्रमाणेच महाविद्यालयाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पास देण्याची सोय करावी. त्यामुळे अशा प्रकारचे वाद होणार नाहीतच, शिवाय गडबड गोंधळ उडणार नाही, असे बेलवाडी येथील पालक हेमंत थोरात, पवारवाडी येथील पालक बाळासाहेब शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दरम्यान, पास काढण्यासाठी गर्दी झाल्यावर एका दिवसात पास मिळत नाही, अनेकदा पास काढण्यासाठी शाळा, महाविद्यालयाचे तास बुडवावे लागतात. अनेकदा विद्यार्थ्यांना दांडी मारावी लागते, असे येथील विद्यार्थ्यांनी सांगितले.

Web Title: Student pass schedules collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.