VIDEO : गांधीगिरी मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी स्वखर्चाने पाठवले घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 06:40 PM2022-10-18T18:40:15+5:302022-10-18T18:52:02+5:30
अडीच वाजता अलका चौक परिसरात अडकलेल्या राहुलची रेल्वे सुटली अन्...
- शिवानी खोरगडे
पुणे : रेल्वेने गावी जाण्याच्या तयारीत असलेल्या युवकाला अलका टॉकीज चौकात वाहतूक पोलिसांनी अडवले. त्याच्या गाडीवर जुना दंड असल्याने पोलिसांनी तो भरल्याशिवाय जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली; पण माझी रेल्वेची वेळ झाली असून, मला सोडा, मी ऑनलाइन दंड भरतो, अशी विनवणी तरुणाने करूनही पोलिसांनी त्याला जाऊ दिले नाही. रेल्वेचा वेळ होऊन गेल्यानंतर चिडलेल्या युवकाने त्याच चाैकात रस्त्यावर झोपून वाहतूक पोलिसांविरोधात आंदोलन सुरू केले. अखेर अर्धा ते पाऊण तासानंतर आम्ही तुला गावाला पाठवतो, असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर तरुणाने आंदोलन मागे घेतले.
सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास राहुल धांडे हा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा युवक यवतमाळला आपल्या मूळ गावी जाण्यासाठी निघाला होता. दुपारी सव्वातीनच्या सुमारास त्याची रेल्वे होती. दरम्यान, अलका टॉकीज चौकात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांनी त्याची दुचाकी अडवली. राहुलचा मित्र दुचाकी चालवत होता. यावेळी पोलिसांनी कागदपत्रांची विचारणा केली असता राहुलकडे सगळी कागदपत्रे होती; पण त्याच्या दुचाकीवर २०१९ साली एक दंड ठोठावण्यात आला होता. ते पेंडिंग असल्याने पोलिसांनी तो दंड आधी भर आणि जा, असे सांगितले; पण माझ्याकडे सध्या पैसे नाहीत, मी चार महिन्यांनंतर गावी आई-वडिलांकडे जात आहे. मी ऑनलाइन दंड भरतो, अशी राहुल पोलिसांना विनवणी करत होता; पण पोलीस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर रेल्वेची वेळ होऊन गेल्यावर राहुलने रस्त्यावरच झोपून आंदोलन करण्यास सुरुवात केली. अर्ध्या तासानंतर पोलिसांनी त्याला आम्ही यवतमाळला तुझी जाण्याची व्यवस्था करतो, असे सांगत त्याचे आंदोलन थांबवले. तोपर्यंत रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. राहुल रस्त्यावर झोपून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता.
विमानतळावर जाणाऱ्या कारला सोडले...
राहुल धांडेला वाहतूक पोलिसांनी पकडल्यानंतर तो पोलिसांना सोडण्याची विनवणी करत असतानाच त्याच्या सांगण्यानुसार एक कार या रस्त्याने जात होती. पोलिसांनी या कारलादेखील अडवले. यावेळी कारमधील प्रवाशांनी विमानतळावर जायचे आहे, असे सांगत एका बड्या पोलीस अधिकाऱ्याला फोन लावला. त्यामुळे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्या कारला सोडून दिले. यामुळे रागावलेल्या राहुलने पोलीस कारचालकाशी वेगळे वागले आणि माझ्याशी वेगळे वागत आहेत, हे लक्षात येताच रस्त्यावर झोपून आंदोलनाला सुरुवात केल्याचे सांगितले.
नेहमी गरिबांची थट्टाच का..?
राहुलचे आई-वडील गावी शेती करतात. तो पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी भाड्याने राहतो. त्याला महिन्याला ८-९ हजार खर्च येतो. आई-वडिलांवर पैशांचा ताण नको म्हणून राहुल एक अभ्यासिका सांभाळतो आणि तिथेच अभ्यास करतो. अनेक महिन्यांपासून गावी न गेलेला राहुल दिवाळीनिमित्त गावी जात होता. मात्र वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्याला अडवले. एकंदरीत नेहमीच गरीब, ओळख नसलेल्या नागरिकांशी पोलीस असे वागतात, हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यातच अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी दिवाळीच्या काळात नागरिकांवर दंडात्मक कारवाई न करण्याचे सांगितलेले असताना कर्माचारी मात्र आपली दंडेलशाही करताना दिसून येतात.