पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजच्या होस्टेलमध्ये विद्यार्थिनीने पेटवून घेतले; उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2024 08:44 AM2024-03-20T08:44:02+5:302024-03-20T08:46:57+5:30
अधिक तपास सुरू आहे.
किरण शिंदे, पुणे: होस्टेलच्या कॅन्टीन मधील कर्मचाऱ्यांच्या छेडछाडीला कंटाळून आणि रूममेटच्या त्रासाला कंटाळून १९ वर्षीय विद्यार्थिनी इंजीनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्येच पेटवून घेतले होते. उपचार सुरू असताना या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. भारती विद्यापीठ येथील इंजीनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये ७ मार्च रोजी हा प्रकार घडला होता. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेणुका बालाजी साळुंके (वय १९) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनींचे नाव आहे. तर या प्रकरणी हॉस्टेलमध्ये कॅन्टीनमध्ये काम करणारा कर्मचारी सतीश जाधव आणि हॉस्टेलमध्येच राहणारी मुस्कान महेंद्रसिंग सिद्धू (वय १९) यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी धोंडीबा साळुंखे (वय ४९, जेवळी तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांची मुलगी रेणुका साळुंखे ही भारतीय विद्यापीठ येथील इंजीनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत होती. होस्टेलच्या कॅन्टीन मधील कर्मचारी सतीश जाधव हा रेणुकाला सारखे आय लव यू असे मेसेज करायचा. तू इतकी बिझी झालीस का? मी किती मेसेज केले, असे तो सारखा येता-जाता बोलायचा. या सर्व प्रकारमुळे रेणुका खूप घाबरली होती. याशिवाय हॉस्टेलमध्ये तिच्या रूममध्ये राहणारी मुस्कान सिद्धू ही देखील रेणुकाला अभ्यास करू द्यायची नाही. रूम मधील लाईट बंद करून टाकायची.
या दोघांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून रेनुकाने अखेर होस्टेलच्या बाथरूममध्ये ७ मार्चच्या रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास स्वतःला पेटवून घेतले होते. पुण्यातीलच सूर्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.