विद्यार्थिनीची छेड; दोन गटांत धुमश्चक्री
By Admin | Published: January 7, 2016 01:38 AM2016-01-07T01:38:12+5:302016-01-07T01:38:12+5:30
एका शाळकरी मुलीची शाळेत जाताना छेड काढल्यावरून पिसुर्टी, ता. पुरंदर येथे दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. यात एक जण गंभीर जखमी झाला,
जेजुरी : एका शाळकरी मुलीची शाळेत जाताना छेड काढल्यावरून पिसुर्टी, ता. पुरंदर येथे दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. यात एक जण गंभीर जखमी झाला, तर इतर ८ जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. जेजुरी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून एकमेकांविरुद्ध फिर्यादी दाखल झाल्या आहेत.
याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : काल (दि. ५) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दोन दिवसांपूर्वी सनी तुळशीराम चोरमले याने वाल्हे येथे शाळेला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढली होती. यावरून फिर्यादी जगन्नाथ नामदेव बरकडे आणि विरोधी फिर्यादी ज्ञानेश्वर माणिक चोरमले यांच्यात भांडणे झाली. भांडणाचे पर्यवसान दोन गटांत दगड, हॉकी स्टिक, लाकडी दांडक्यांनी हाणामारीत झाले. यात दोन्हीकडील मिळून नऊ जण जखमी झाले आहेत. यात जगन्नाथ बरकडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार दीपक बाळू बरकडे, सुभाष बाळू बरकडे, ज्ञानेश्वर माणिक चोरमले, तानाजी साहेबराव चोरमले, रणजित तुकाराम चोरमले, भीमराव साहेबराव चोरमले, जीवन बाळू चोरमले, आशिष चोरमले, मैनाबाई साहेबराव चोरमले, शालन माणिक चोरमले, अंजना बाळू बरकडे आणि सनी तुळशीराम चोरमले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरोधी फिर्यादी ज्ञानेश्वर माणिक चोरमले यांच्या फिर्यादीवरून जगन्नाथ नामदेव बरकडे, विलास नामदेव बरकडे, नानासाहेब नामदेव बरकडे, सत्यवान अण्णा बरकडे, सुजित विलास बरकडे, मुक्ताबाई नामदेव बरकडे, पूनम जगन्नाथ बरकडे, वन्ािता जगन्नाथ बरकडे, रेखा विलास बरकडे, सीमा नानासाहेब बरकडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. दोन्हीकडील आरोपी लोणंद येथील खासगी दवाखाना व पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याने अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. पुढील तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव आणि पोलीस हवालदार एच. एन. गार्डी करीत आहेत. (वार्ताहर)