विद्यार्थ्यांना हवे ‘आधार’
By admin | Published: January 6, 2016 12:43 AM2016-01-06T00:43:16+5:302016-01-06T00:43:16+5:30
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महापालिका शाळांच्या सर्व विद्यार्थ्यांचे आधारकार्डचे काम पूर्ण व्हायला हवे होते.
पिंपरी : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महापालिका शाळांच्या सर्व विद्यार्थ्यांचे आधारकार्डचे काम पूर्ण व्हायला हवे होते. मात्र, आधार चालकांच्या बेजबाबदारपणामुळे अद्यापही सात हजार विद्यार्थ्यांना आधारकार्ड मिळाले नाही.
महापालिकेच्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याचे काम तीन महिन्यांपासून सुुरू होते. काही आधारचालकांनी प्रामाणिकपणे आधार काढण्याचे काम केले, तर काहींनी आधारचे काम करण्यास चालढकल केली.
सध्या महापालिका विद्यार्थ्यांची संख्या ३९ हजार ८४५ आहे. त्यातील ३२ हजार ७४७ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढून झाले आहेत. अद्याप ७ हजार ९८ विद्यार्थ्यांना आधारकार्ड मिळालेले नाही. यातील काही विद्यार्थी गैरहजर आहेत. याचा पाठपुरावा शिक्षण मंडळाच्या पर्यवेक्षकांनी घेतला आहे. तशी उरलेल्या विद्यार्थ्यांची यादी शिक्षण विभागाकडे सादर केली आहे.
आधारकार्ड काढण्याचे ८० टक्के काम शिक्षण प्रशासनाने पूर्ण केले आहे. सुरूवातीला आधार काढण्यासाठी ३० मशिन दिल्या होत्या. काही कालावधीने त्या कमी झाल्या. सध्या आधारकार्ड काढण्यासाठी नऊ मशिन सुरू होत्या. त्यातील तीन मशिन अंगणवाडीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. आधार मशिन अपुऱ्या असल्यामुळे आधारचे काम अपूर्ण राहिले आहे.
पुणे आयुक्तालय यांच्याकडून आधार केंद्रचालकांना आदेश दिले होते की, दिवसाला सरासरी ७५ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढणे आवश्यक आहे. मात्र केंद्रचालकांनी ५० आधारकार्डही काढले नाहीत. केंद्रचालक प्रतिसाद देत नसल्याने, तसेच संवादाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना आधारकार्डपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. उरलेल्या विद्यार्थ्यांचे पालक पैसे देऊन खासगी संस्थाचालकांकडून आधार काढत आहेत. याचा भुर्दंड पालकांना सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)