सरकारी नोकरभरतीमधील भ्रष्टाचाराविरूध्द विद्यार्थ्यांचा एल्गार, पुणे ते मुंबई पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 10:36 PM2018-05-11T22:36:50+5:302018-05-11T22:36:50+5:30
पुण्यातील डेक्कन नदीपात्रातून १९ मे रोजी या लाँगमार्चला सुरूवात होणार आहे.
पुणे : सरकारी नोकर भरती भ्रष्टाचार विरोधी संघर्ष समितीच्या वतीने दि. १९ ते २४ मे या कालावधीत पुणे ते मुंबई अशी पदयात्रा (लाँगमार्च) काढण्यात येणार आहे. पुण्यातील डेक्कन नदीपात्रातून १९ मे रोजी या लाँगमार्चला सुरूवात होणार आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील कार्यकर्ते यामध्ये सहभागी होणार आहेत.
राज्य सेवेतील व जिल्हा पातळीवरील नोकरी भरती घोटाळयांची न्यायालयीन चौकशी, मागील सात वर्षात झालेल्या बोगस नियुक्त्यांची चौकशी, खोटे खेळाडू, जात, अपंग व टाईपिंग प्रमाणपत्र देवून शासकिय सेवेत आलेल्यांचे निलंबन, गट अ ते गट ड वर्गातील सर्व परीक्षा राज्या सेवा आयोगामार्फत घेण्यात याव्यात, राज्य शासनामधील १ लाख ७७ हजार रिक्त जागा तसेच पोलिसांच्या ५० हजार रिक्त जागा तत्काळ भरण्यात याव्यात, खाजगी कंपनीला नोकर भरतीची कामे कंत्राटी पध्दतीने देवू नये. महापोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा आॅफलाईन पध्दतीने, यूपीएससी, एमपीएससीची स्वतंत्र इमारत व राज्यभरात चार प्रादेशिक मुख्यालय आदी मागण्या संघर्ष समितीच्या वतीने शासनापुढे ठेवण्यात येणार आहेत.
या आंदोलनामध्ये विद्यार्थी तसेच विविध चळवळीमधील कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन योगेश जाधव,अभय टकसाळ, गिरीष फोंडे, अमोल हिपरगे, सागर दुर्योधन, पंकज चव्हाण, प्रदिप घागरे, संतोश खोडदे, साई डहाळे, महेश बडे यांनी केले आहे.
.............
रात्रीचा प्रवास करीत मुंबईमध्ये धडकणार
विद्यार्थ्यांचा लाँगमार्च पुण्यातील डेक्कन नदीपात्र चौपाटी पासून १९ मे रोजी सुरू होईल. त्यानंतर दररोज रात्रीचा प्रवास करीत तळेगांव दाभाडे, लोनावळा, कर्जत, कल्याण, ठाणे असा प्रवास करीत दिनांक २४ मे रोजी मुंबईतील आझाद मैदानात धडकणार आहे.