विद्यार्थी निवडणुकीत पॅनल तयार करण्यास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 06:00 AM2019-07-15T06:00:21+5:302019-07-15T06:00:25+5:30
सामाजिक संघटना किंवा व्यक्ती यांसह कोणत्याही राजकीय पक्षाचा, इतर संघटनांचा सहभाग तसेच चिन्ह, बोधचिन्ह आणि छायाचित्राचा वापर करता येणार नाही.
पुणे : महाविद्यालयातील विद्यार्थी निवडणुकांच्या दरम्यान पॅनल तयार करता येणार नाही, सामाजिक संघटना किंवा व्यक्ती यांसह कोणत्याही राजकीय पक्षाचा, इतर संघटनांचा सहभाग तसेच चिन्ह, बोधचिन्ह आणि छायाचित्राचा वापर करता येणार नाही. महाविद्यालयाच्या किंवा विद्यापीठाच्या आवारात मिरवणुका आणि मेळावे घेण्यास परवानगी असणार नाही, असे राज्य शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी निवडणुका केवळ औपचारिकता म्हणून घेतल्या जात आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.
नवीन विद्यापीठ कायद्यात अनेक बंधने घातली आहेत.
प्रत्येक विद्यार्थ्याला मतदान करता येईल. मात्र विद्यापीठ किंवा महाविद्यालयाच्या आवारात आवारात मिरवणुका व मेळावे घेता येणार नाहीत. निवडणुकीसाठी प्राचार्यांकडून भित्तीपत्रकाचा आकार आणि नमुना ठरविला जाईल. उमेदवारांना चिन्ह, छायाचित्र किंवा प्रतिमा यांचा वापर करता येणार नाही, असेही आचारसंहितेत म्हटले आहे.
>खूप वर्षांनंतर महाविद्यालयात खुल्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जात आहेत. तज्ज्ञ समितीने निवडणुकांसाठी आवश्यक आचारसंहिता तयार केली आहे. काही अडचणी आल्यास शासनाकडे आचारसंहितेमध्ये बदल करण्याची मागणी केली जाईल.
- स्वप्नील बेगडे, प्रदेशमंत्री, अभाविप