विद्यार्थ्यांना संपूर्ण भारतीय बनविले जात नाही : जावेद अख्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 10:22 PM2019-01-23T22:22:35+5:302019-01-23T22:23:14+5:30
देशातील एककल्ली शिक्षणपद्धतीमुळे विद्याथर्थ्यांना इंजिनिअरिंग, मेडिसीन, चार्टर्ड अकाऊटिंग त्या त्या विषयांची माहिती तर होते. मात्र इतर विषयात त्यांची पाटी कोरीच राहाते. विदयार्थ्यांना संपूर्ण ‘भारतीय’ च बनविले जात नाही अशा शब्दातं देशाच्या शिक्षणव्यवस्थेवरच ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी ताशेरे ओढले.
पुणे : जी गतिमंद मुलं असतात. ती बाकी काहीच करू शकत नाही. एकाला पेपर दिले तर तो कागदावर शीप काढेल. दुसरा पेपराचे बारीक तुकडे करेल, तिस-याला मागच्या आणि पुढच्या पन्नास वर्षांच्या तारखा माहिती असतील. एकच गोष्ट तो अगदी मनापासून करेल. बाकी काहीच त्याला येणार नाही. हा एक मानसिक आजार आहे. पण विचार केला तर अशाच प्रकारे देशातील एककल्ली शिक्षणपद्धतीमुळे विद्याथर्थ्यांना इंजिनिअरिंग, मेडिसीन, चार्टर्ड अकाऊटिंग त्या त्या विषयांची माहिती तर होते. मात्र इतर विषयात त्यांची पाटी कोरीच राहाते. विदयार्थ्यांना संपूर्ण ‘भारतीय’ च बनविले जात नाही अशा शब्दातं देशाच्या शिक्षणव्यवस्थेवरच ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी ताशेरे ओढले.
सिंबायोसिसच्या रौप्यमहोत्सवी सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा, सिंबायोसिसचे संस्थापक- अध्यक्ष डॉ शां.ब मुजुमदार, सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ विद्या येरवडेकर उपस्थित होत्या. यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांना जावेद अख्तर यांच्या हस्ते सिंबायोसिस सांस्कृतिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच महोत्सवाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नाट्य, गायन,संगीत, नृत्य आणि चित्रपट या क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या संस्थांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये भरत नाट्य मंदिर, भारत गायन समाज,आर्य संगीत प्रसारक मंडळ, मनीषा नृत्यालय आणि आशय फिल्म क्लब यांचा समावेश होता.
जावेद अख्तर यांनी आपल्या भाषणात देशातील शिक्षणपद्धतीवरच टीकास्त्र सोडले. सेंटर फॉर अडव्हायझरी बोर्ड ऑफ एज्युकेशच्या कमिटीमध्ये असताना एक प्रश्न उपस्थित केला होता. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कोणत्याही शाळेमध्ये गेल्यास तिथल्या आठ वर्षांच्या मुलाला चित्र काढ असे सांगितले जाते तेव्हा तो डोंगर, त्याच्यामागे सूर्य, घर, एक दार खिडकी आणि अगदीच जमल्यास नदी व त्यात नाव हेच चित्र काढेल. भारतातील प्रत्येक शाळांमधील सात ते आठ वर्षांचा मुलगा हेच चित्र रंगवताना दिसेल. मग आपण मुलांना कोणत्याप्रकारचे शिक्षण देत आहोत? असा सवाल उपस्थित करीत ते म्हणाले, आपण मुलांची कल्पनाशक्ती हिरावून घेत त्यांना एका चौकटीत बसवत आहोत. ज्या मुलाने नदी, डोंगराच्या मागे उगवणारा सूर्य ते घर या गोष्टी जर पाहिल्याच नसतील तर त्याला आपण का हे चित्र बनवायला लावत आहोत? तो आठ वर्षांचा मुलगा आपली गल्ली किंवा घराचे चित्र का बनवत नाही? पण त्यांना हेच करायचे असे सांगितले आहे.
मला सात ते आठ वर्षांपूर्वी आर्थिक मंत्रालयाने वक्ता म्हणून बोलावले होते. खरेतर लेखकाचा अर्थ खात्याशी काडीमात्र संबंध नसतो अशी मिश्किल टिप्पणी करीत ते पुढे म्हणाले, तेव्हा मला प्रश्न विचारला होता की देशाच्या अंदाजपत्रकामध्ये बदल करायचा झाल्यास काय कराल ? तेव्हा अंदाजपत्रकात शिक्षणासाठी 10 टक्के तरतूद करेन असे उत्तर दिले होते. सध्याच्या शिक्षण क्षेत्राला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्यामध्ये भाषा ही प्रमुख समस्या आहे. दोन वेळेची रोटी खाऊन जगणारे लोक मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालत आहेत. इंग्रजी यायलाच हवी हे खरं आहे. जे इंग्रजी सोडा म्हणतात ते आपले शत्रूच आहेत. पण आपल्या भाषेची किंमत मोजून इंग्रजीला महत्व देता कामा नये. त्यामुळे उच्च मध्यमवर्गीय भाषेपासून तुटत चालला आहे. भाषेच्या मजबूत खांबावरच संस्कृती टिकून असते, अशा शब्दातं त्यांनी मातृभाषेचे महत्व विशद केले. इंग्रजीच्या मानसिकतेमुळे आपण आपल्या मुलांना विहिरीतले बेडूक बनवत आहोत. ज्यांना संस्कृती, इतिहासाबद्दल माहिती नाही. आपण शिक्षणाचा वृक्ष तर उभा करीत आहोत. मात्र त्याची मूळ, फांद्या वेगळ्या ठिकाणी अशी सध्याची परिस्थिती आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
’राष्ट्रवादा’चा खरा अर्थ उमगला नाही
'राष्ट्रवादी कोण आणि राष्ट्रद्रोही कोण, यातच आपण गुंतून गेलो आहोत. हा आमचा देश, हा त्यांचा देश, हा भेदभाव काय कामाचा ?... खरंतर, राष्ट्रवाद ही जगण्याची रीत आहे. त्यात देशाप्रती कर्तव्य अपेक्षित आहे. पण आम्हाला या शब्दाचा खरा अर्थ उमगू शकलेला नाही, अशी खंत प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केली. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठातर्फे फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स या कार्यक्रमात त्यांनी ‘राष्ट्रवादा’वर राज्यकर्त्यांना खडे बोल सुनावले. निव्वळ शाब्दिक राष्ट्रवादापेक्षा आज आपल्याला सदभावनेच्या राष्ट्रवादाची गरज आहे. दुदैवाने तसे आज घडताना मात्र दिसत नाही. राष्ट्रवादाच्या घोषणा देण्यापेक्षा खरी देशभक्ती, खरे देशप्रेम महत्त्वाचे. दुदैवाने आपण सामाजिक बांधिलकी विसरत गेलो, असल्याचे ते म्हणाले.