विद्यार्थी दप्तराच्या ओझ्याखालीच!
By admin | Published: July 25, 2015 04:32 AM2015-07-25T04:32:42+5:302015-07-25T04:32:42+5:30
दप्तरांच्या ओझ्याच्या प्रश्नावर राज्यात चर्चेला उधाण आले आहे. मात्र प्रत्यक्षात ते कमी करण्यासाठी ना शासन, ना पालक, ना शाळा पुढे येत आहेत
पुणे : दप्तरांच्या ओझ्याच्या प्रश्नावर राज्यात चर्चेला उधाण आले आहे. मात्र प्रत्यक्षात ते कमी करण्यासाठी ना शासन, ना पालक, ना शाळा पुढे येत आहेत. त्यामुळे आजही विद्यार्थी दप्तरांच्या ओझ्याखाली दबलेलेच आहेत. आपल्या वयाच्या, उंचीच्या तुलनेत कित्येक पटीने अधिक रोज दप्तराचे ओझे विद्यार्थी मुकाटपणे वाहत आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना खांदेदुखी, पाठदुखी झाली आहे. ‘लोकमत’ टीमने केलेल्या पाहणीमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी शुक्रवारी शहराच्या विविध भागांमधील शाळांची पाहणी केली. शाळेतील विद्यार्थ्यांचे वजन आणि त्यांच्या दप्तराचे वजन करण्यात आले. यात सर्वच शाळांमधील पहिली ते दहावीतील सर्वच विद्यार्थी जास्त वजन असलेले दप्तर आणत आल्याचे दिसून आले.
या राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच घोषणा केली की, ‘‘आता मुलांच्या दप्तरांचे वजन हे त्या मुलाच्या वजनाच्या दहा टक्के असेल.’’ या घोषणेमुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला. त्याचबरोबर न्यायालयाने विद्यार्थांच्या पाठीवरील ओझे निश्चित कालावधीत कमी करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहे. पण ही चर्चा तशी जुनीच आहे.
आघाडीचे सरकार असतानाही दप्तरांच्या ओझ्याचा प्रश्न राज्यभर विविध कारणांने गाजत राहिला. यावर मुख्यमंत्र्यांपासून शिक्षणमंत्री, शिक्षण संचालक यांच्यापासून या क्षेत्रातील तज्ज्ञांनी खूप उहापोह केला. पण या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर काहीच झाले नाही. युतीचे सरकार येऊन ८ महिने उलटले तरी हे चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. त्यापलिकडे विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, असे काहीच झालेले नाही. त्यामुळे बहुतांशी शाळांमधील मुले आजही २ किलोंपासून १० किलोंपर्यंतचे दप्तराचे वजन मुकाटपणे वाहत आहेत. अनेक मुलांचे वजन अवघे ३०-४० किलो असताना विद्यार्थी ७ ते ८ किलो वजन असलेले दप्तर वाहत आहेत. यावरून या विद्यार्थ्यांची केविलवाणी अवस्था दिसून येत आहे. या मुलांशी चर्चा केली असता, ‘‘सर्व विषयांची पुस्तके, वह्या शाळांमध्ये घेऊन येतो. त्यामुळे रोज दप्तर भरलेलेच असते. कधी कधी तर शाळेनंतर क्लासही असतो. त्यामुळे त्याच्या वह्या, गाईडही दप्तरात आणावी लागतात. दप्तरांच्या ओझ्याने खांदे दुखतात, पाठ दुखते, कंटाळा येतो. पण काय करणार?’’ अशा बोलक्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या. काही शाळांमध्ये तर तासांचे वेळापत्रकच नसल्याने मुलांना नाईलाजास्तव सर्वच विषयांच्या वह्या, पुस्तके आणावी लागत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, मुलांच्या या त्रासाकडे पालक आणि शाळा दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.