तळेगावमध्ये विद्यार्थ्याचा खून
By Admin | Published: September 3, 2016 03:16 AM2016-09-03T03:16:35+5:302016-09-03T03:16:35+5:30
तळेगावमधील इंद्रायणी महाविद्यालयाच्या आवारात महाविद्यालय सुरू असताना वाणिज्य शाखेत बारावीच्या वर्गात शिकत असणाऱ्या चेतन दत्तात्रय पिंजण (वय १७, रा. पानसरे
वडगाव मावळ : तळेगावमधील इंद्रायणी महाविद्यालयाच्या आवारात महाविद्यालय सुरू असताना वाणिज्य शाखेत बारावीच्या वर्गात शिकत असणाऱ्या चेतन दत्तात्रय पिंजण (वय १७, रा. पानसरे वस्ती, कॅडबरी कंपनीसमोर, इंदोरी) या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. घटनेनंतर त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
चेतनचे वडील दत्तात्रय पिंजण (वय ४८) यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . चेतन याचे गुरुवारी मित्रांसोबत भांडण झाले होते. त्यातूनच हा हल्ला करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन सकाळी नेहमीप्रमाणे कॉलेजला त्याच्या बुलेटवरून आला, त्या वेळी त्याच्यावर दोघांनी मागून धारदार शस्त्राने डोक्यावर आणि छातीवर अनेक वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. इंद्रायणी महाविद्यालयात हाणामारीचे किरकोळ प्रकार रोजच घडत असतात. म्हणून महाविद्यालय प्रशासनाने महाविद्यालय परिसरात चार सुरक्षारक्षक नेमले आहेत.
पोलीस अधीक्षक जय जाधव, उफविभागीय अधिकारी विनायक ढाकणे, स्थानिक गुन्हे विभाग पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास तळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर करीत आहेत.
(वार्ताहर)
घटनेनंतर आरोपींना शिवणे गावातून ताब्यात घेण्यात आले. चहाच्या टपरी काढण्याच्या वादातून ही घटना घडली. पोलीस निरीक्षक बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र मिडगे, सतीश हेडगर, शंकर जम, विजय पाटील, दयानंद लिमण, सुनील जावळे या पथकाने आरोपींना अटक केली.