पुण्यातील विद्यार्थ्यांनी केले मनस्मृतीचे दहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 07:16 PM2018-08-11T19:16:16+5:302018-08-11T19:17:50+5:30
पुण्यातील गरवारे महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यांनी मनस्मृतीचे दहन केले.
पुणे : दिल्लीतील जंतरमंतरवर भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्याच्या निषेधार्थ पुण्यातील गरवारे महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून मनस्मृती जाळण्यात अाली. तसेच संविधानाच्या प्रस्तावनेचे सामुहिक पठणही करण्यात अाले.
दिल्लीतील जंतरमंतर येथे २ दिवसांपूर्वी काही व्यक्तींनी भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्याची घटना घडली होती. याचा व्हिडिअाे समोर आल्यानंतर देशभरात याचा निषेध केला जात आहे. संविधान जाळणाऱ्यांवर देशद्राेहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात येत अाहे. अाज सकाळी गरवारे महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यांनी मनस्मृतीच्या पाेस्टरचे दहन करत दिल्लीच्या घटनेचा निषेध केला. तसेच संविधान जाळणाऱ्यांचे नागरिकत्व काढून घेण्याची मागणीही यावेळी करण्यात अाली. या अांदाेलनात 30 ते 40 विद्यार्थी सहभागी झाले हाेते. यावेळी संविधानाच्या जयजयकाराच्या घाेषणाही देण्यात अाल्या.
सागर अलकुंटे म्हणाला, ज्या दिवसापासून भाजप सरकार सत्तेत अाले अाहे, तेव्हापासून देशात अनेक संविधान विराेधी घटना घडल्या अाहेत. सरकार या घटनांना व अाराेपींना पाठीशी घालत अाहे. दाेषींवर कुठलीही कारवाई केली जात नाही. दाेन दिवसांपूर्वी दिल्लीतील जंतरमंतरवर संविधानाच्या प्रती जाळल्याची घटना समाेर अाली अाहे. दाेन दिवसांनंतरही दाेषींवर कारवाई करण्यात अालेली नाही. संविधानाच्या प्रति जाळणाऱ्यांचे नागरिकत्व काढून घेण्यात यावे अशी अामची मागणी अाहे.