महापालिकेच्या इयत्ता १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:58 AM2017-11-24T00:58:27+5:302017-11-24T00:58:58+5:30
पुणे : महापालिकेच्या इयत्ता १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अनुक्रमे १५ व २५ हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे पैसे लवकरच संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.
पुणे : महापालिकेच्या इयत्ता १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अनुक्रमे १५ व २५ हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे पैसे लवकरच संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. या वर्षी प्रथमच ही योजना संपूर्ण आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात आली.
महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने इयत्ता १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी १५ हजार रुपये देणारी मौलाना अबुल कलाम आझाद व इयत्ता १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे ही २५ हजार रुपये देणारी शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. त्यासाठी खुल्या गटाला ८० टक्के, मागासवर्गीय गटाला ७० टक्के, अपंगांना ६५ टक्के गुणांची अट आहे. दर वर्षी या योजनेसाठी महापालिका अर्ज मागवून घेते. या वेळी मात्र त्यासाठी संपूर्ण आॅनलाईन पद्धत अवलंबिवण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांकडून त्यांचा बँक खाते क्रमांकही घेण्यात आला आहे. इयत्ता १२ वीसाठी २ हजार ५०० अर्ज आले आहेत, तर १०वीसाठी आलेल्या अर्जांची संख्या ६ हजार ३९८ आहे. यातील काही अर्जांमध्ये त्रुटी होत्या. त्या दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी दिल्यामुळे योजनेला विलंब होत गेला, अशी माहिती मुख्य समाजविकास अधिकारी संजय रांजणे यांनी दिली.
आता येत्या ८ डिसेंबरपर्यंत त्यांना त्रुटी दूर करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे. काय त्रुटी आहेत्,ा हे त्यांना त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून कळविण्यात आले आहे. त्यांनी मुदतीत त्रुटी दूर केली नाही, तर त्यांचा अर्ज नाकारला जाईल, असे ते म्हणाले.
महापालिकेने अंदाजपत्रकात या योजनेसाठी १६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आणखी काही रक्कम लागणार आहे; मात्र वरिष्ठ स्तरावरून पदाधिकाºयांशी संपर्क साधून त्याचे वर्गीकरण केले जाते. या योजनेसाठी आतापर्यंत एकदाही पैसे नाहीत असे झालेले नाही, अशी माहिती समाजविकास विभागाकडून देण्यात आली. या वर्षीच्या सर्व अर्जांची छाननी झाली आहे. वरिष्ठ व पदाधिकारी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर लवकरच सर्व पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, असे रांजणे यांनी सांगितले. आॅनलाईन पद्धत अवलंबल्यामुळे या वर्षी ही योजना विनाविलंब राबवली जात आहे. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने ही योजना महापालिका राबवीत असून आतापर्यंत काही लाख विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करून घेतला असल्याचे रांजणे यांनी सांगितले.