कर्ज काढून शिकताहेत स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 11:31 PM2019-01-10T23:31:40+5:302019-01-10T23:32:08+5:30
विचारवेध संस्थेच्या पाहणीतील निष्कर्ष : वर्षाला सरासरी १ लाख २० हजारांचा खर्च
पुणे : अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी पुण्याकडे धाव घेत आहेत. त्यातील ११ टक्के विद्यार्थी हे गावी कर्ज काढून, उसनवारी करून पुण्यात परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी येत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष विचारवेध संस्थेने केलेल्या पाहणीमध्ये आढळून आले आहे.
विचारवेध संस्थेकडून येत्या १२ व १३ जानेवारी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ‘विचारवेध’ संमेलनाचे आयोजन केले आहे. या पार्श्वभुमीवर विचारवेध संस्थेकडून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांचा सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये आढळून आलेले निष्कर्ष संस्थेकडून जाहीर करण्यात आले आहेत. पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी येणाºयांपैकी ४८ टक्के विद्यार्थी हे खेडेगावातून आलेले आहेत. त्याचे शिक्षण हे छोटया खेडयांमध्येच पूर्ण केलेले आहे. एखाद्या गावातील कुणी मित्र पुण्यात अभ्यास करून नोकरीला लागला, त्याचे पाहून त्याचे पाहून त्या गावातील अनेक गावकºयांनी आपल्या मुलांना पुण्यात शिकण्यासाठी पाठविले आहे. अगदी ऐपत नसतानाही कर्ज काढून त्यांना पुण्यात शिकायला पाठविण्यात येत आहे. स्पर्धा परीक्षांसाठी पुण्यात आलेले ९० टक्के मुले-मुली भाडयाच्या एका खोलीत किंवा कॉट बेसीसवर दाटीवाटीने राहतात. एका खोलीत साधारणत ३ ते ६ जण एकत्र राहत असल्याचे या पाहणीमध्ये आढळून आले. या मुलांचा राहणे, खाणे, क्लासची फि, पुस्तके आदींसाठी वर्षांला सरासरी १ लाख २० हजार रूपये इतका खर्च होत आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया ३४ टक्के विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचे आढळून आले.