विद्यार्थ्यांनी तयार केल्या 11 हजार शाडू मातीच्या गणेशमूर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 07:43 PM2018-09-18T19:43:42+5:302018-09-18T19:45:51+5:30
विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी 21 दिवसांमध्ये 11 हजार शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार केल्या.
पुणे : पीअाेपी वापरुन गणेशमूर्ती तयार केल्या जात असतात. त्यांचे विसर्जन नदीत केल्याने पर्यावरणाचे माेठे नुकसान हाेत असते. त्यामुळे विविध सामाजिक संघटनांकडून शाडू मातीची मूर्ती वापरावी यासाठी जागृती करण्यात येते. यासाठीच पुण्यातील स्ट्राेक्स फांउंडेशन तर्फे पुण्यातील विविध भागातील 30 पेक्षा अधिक शाळांमधून पर्यावरणपूरक शाडूच्या मातीचे गणपती बनवण्याच्या कार्यशाळेचे अायाेजन करण्यात अाले हाेते. या कार्यशाळेत 21 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी अकरा हजार मूर्ती तयार केल्या.
स्ट्राेक्स फाउंडेशनच्या वतीने 23 अाॅगस्ट ते 12 सप्टेंबर 2018 या कालावधीत पुणे अाणि पिंपरीचिंचवड भागातील 30 हून अधिक शाळांमध्ये शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात अाले. मुलांना संस्थेतर्फे शाडूची माती पूरविण्यात अाली हाेती. मुलांना हाताने गणपती मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात अाले. या मूर्ती तयार करताना कुठलाही साचा वापरण्यात अाला नाही. केवळ 21 दिवसात अकरा हजार शाडू मातीच्या गणपतीमूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
या उपक्रमाबाबत बाेलताना स्ट्राेक्सचे संस्थापक चेतन पानसरे म्हणाले, सगळीकडे पीअाेपीच्या मूर्तींचा वापर केला जाताे. पीअाेपी पाण्यात विरघळत नसल्याने पर्यावरणाचे माेठ्याप्रमाणावर नुकसान हाेत असते. पर्यावरणाच्या दृष्टीकाेनातून ठाेस पाऊल उचललेले दिसत नाही. लहान मुलांना शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिल्याने त्यांच्यात गणेशाच्या मूर्तीबाबत एक कुतुहल निर्माण हाेते. तसेच त्यांच्यातील कलेलाही यातून चालना मिळते. त्यामुळे अाम्ही विद्यार्थ्यांना शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. मुलांनी स्वतःच्या हाताने मूर्ती तयार केल्याने त्या मुर्तीबाबत त्यांच्या मनात एक अाेढ निर्माण झाली हाेती. याचाच प्रत्यय म्हणजे यंदा अनेक पालकांनी गणेशाेत्सवासाठी मुलांनी तयार केलेल्या मुर्तींचीच प्रतिष्ठापणा केली. पर्यावरणपूरक गणेशाेत्सवाची ही चळवळ वाढणे गरजेचे अाहे.