विद्यार्थ्यांची ‘अनामत’ कॉलेजच्या खात्यात, माहिती अधिकारातून आले उजेडात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 03:05 AM2018-06-10T03:05:28+5:302018-06-10T03:05:28+5:30
महाविद्यालयांच्या विविध शाखांमध्ये प्रवेश घेताना ग्रंथालयातील पुस्तके, प्रयोगशाळांमधील साहित्य हाताळणी आदींसाठी ६०० ते ८ हजार रुपयांपर्यंत अनामत रक्कम घेतली जाते.
पुणे - महाविद्यालयांच्या विविध शाखांमध्ये प्रवेश घेताना ग्रंथालयातील पुस्तके, प्रयोगशाळांमधील साहित्य हाताळणी आदींसाठी ६०० ते ८ हजार रुपयांपर्यंत अनामत रक्कम घेतली जाते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम विद्यार्थ्यांना परत देणे बंधनकारक आहे. मात्र, बहुसंख्य महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना ही रक्कम परत न देता ती कोट्यवधींची रक्कम महाविद्यालयांच्या खात्यामध्ये वर्ग केली जात असल्याचा प्रकार माहिती अधिकारांमधून उजेडात
आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
या विद्यार्थ्यांना त्यांची अनामत रक्कम मिळावी अशी मागणी होत आहे. महाविद्यालयांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडून अनामत रक्कम घेतली जाते; त्यामुळे ती रक्कम लाखो, कोट्यवधींमध्ये जमा होते. ग्रंथालयासाठी ६०० ते हजार रुपये, प्रयोगशाळांसाठी २ ते ३ हजार रुपये, इंजिनिअरिंग, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ५ ते ८ हजार रुपयांपर्यंत अनामत रक्कम घेतली जाते. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांचे निकाल देताना त्यांनी महाविद्यालयांचे सर्व शुल्क अदा केले आहे ना, याची
तपासणी करूनच त्यांना निकाल
दिला जातो. तीच तत्परता
विद्यार्थ्यांनी भरलेली अनामत
रक्कम परत देण्यासाठी दाखविली जात नाही.
दर्शनी भागात अनामत रकमेची सूचना लावा
विद्यार्थ्यांना महाविद्यालये तसेच विद्यापीठांकडून अनामत रक्कम परत मिळावी, यासाठी कुलदीप आंबेकर यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांची
दखल विद्यापीठ प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. महाविद्यालयांनी अनामत रक्कम परत करण्याची सूचना दर्शनी भागावर लावावी. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर त्यांना त्याबाबत माहिती द्यावी. विनाविलंब व विनातक्रार त्यांना
अनामत रकमेचा परतावा करावा, असे परिपत्रक विद्यार्थी
विकास मंडळाच्या संचालकांकडून सर्व महाविद्यालयांना पाठविण्यात आले आहे.
दोन वर्षांची बेकायदेशीर अट
विद्यार्थ्यांनी दोन वर्षांत अनामत रक्कम परत न नेल्यास ती रक्कम महाविद्यालयांच्या खात्यात बेकायदेशीरपणे वर्ग केली जात असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. असा नियम असल्याचे कोणतेही परिपत्रक महाविद्यालयांकडून दिले जात नाही.
मागील ३ वर्षांत
५ कोटी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
३ कोटी : बी. जे. मेडिकल कॉलेज
९.५ लाख : फर्ग्युसन महाविद्यालय
७५ लाख : मॉडर्न महाविद्यालय
५ लाख : गरवारे महाविद्यालय
इतकी अनामत रक्कम विद्यार्थ्यांनी परत नेलेली नाही. वाडिया कॉलेज, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज यांसह अनेक महाविद्यालयांनी किती विद्यार्थ्यांनी अनामत रक्कम अद्याप परत नेली नाही, याची माहिती अद्याप दिली नसल्याचे आंबेकर यांनी सांगितले. सीओईपीने माहिती देण्याची तयारी दर्शविली असून ते पुढील आठवड्यात याची माहिती देणार आहेत.
अनामत रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग करा
महाविद्यालयातील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्याने महाविद्यालयाचे सर्व शुल्क भरले आहे का, याची तपासणी करूनच त्याला त्याचा निकाल दिला जातो. त्याच वेळी विद्यार्थ्यांची अनामत रक्कम परत करण्याबाबत मात्र ही तत्परता दाखविली जात नाही. अनामत रक्कम परत करण्यासाठी क्लिष्ट नियमावलीचा महाविद्यालयांकडून अवलंब केला जातो. महाविद्यालयांकडे सर्व विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा तपशील असतो. विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातील अभ्यासक्रम पूर्ण होताच त्यांनी भरलेली अनामत रक्कम महाविद्यालयांनी त्यांच्या खात्यात वर्ग करावी.
- कुलदीप आंबेकर, प्रदेश सरचिटणीस, जेडीयू
तीन वर्षांची आकडेवारी उघड
४जेडीयूचे प्रदेश सरचिटणीस कुलदीप आंबेकर यांनी शहरातील विविध महाविद्यालये व विद्यापीठाकडे माहिती अधिकारांतर्गत अर्ज करून मागील ३ वर्षांत किती विद्यार्थ्यांनी अनामत
रक्कम परत नेली नसल्याची माहिती मागविली. त्यामध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी अनामत रक्कम परत नेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
४काही महाविद्यालयांनी अनामत रकमेची माहिती देण्यास टाळाटाळ केली. ‘तुम्ही आमच्याकडे ही माहिती का मागता आहात?’ अशी विचारणा आंबेकर यांना करण्यात आली.
४महाविद्यालयांकडे माहिती अधिकाराचे अर्ज टाकण्याबरोबरच आंबेकर यांनी संबंधित महाविद्यालयांच्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून त्यांना याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्याला काही संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन अनामत रक्कम विद्यार्थ्यांना परत देण्याची तयारी दर्शविली आहे.